सॉफ्टटेक कंपनीने तयार केलेल्या ऑटो डिसीआर ऑनलाईन संगणकीय कार्यप्रणालीबाबत कार्यशाळा संपन्न
नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त होणा-या विकास प्रस्तावांची छाननी शासन निर्देशानुसार ऑनलाईन होत आहे. शासनाने दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजीच्या पत्रान्वये बीपीएमएस संगणक प्रणाली व्यतिरिक्त सॉ़फ्टटेक कंपनीने तयार केलेली ऑटो डिसीआर प्रणालीदेखील वापरण्यास मान्यता दिलेली आहे.
या प्रणालीचा उपयोग करून ऑनलाईन बांधकाम परवानगी देण्याच्या कार्यवाहीस सुरुवात करण्यात आलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत ही कार्यप्रणाली नियमीतपणे राबविली जावी यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत असून या प्रणालीव्दारे ऑनलाईन बांधकाम परवानगी प्राप्त करण्याच्या कार्यप्रणालीत वापरकर्त्यांच्या अडचणी दूर करण्याकरिता महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार नगररचना विभागामार्फत महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील उपअभियंता, शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता, विविध विकासक, वास्तुविशारद व त्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. महानगरपालिकेचे सहाय्यक संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण यांनी प्रास्ताविकपर मनोगतात कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका विषद करीत या प्रणालीचा वापर जास्तीत जास्त व्हावा यादृष्टीने कार्यशाळेच्या माध्यमातून समन्वयाचे काम नवी मुंबई महानगरपालिका करीत असल्याचे सांगितले. महानगरपालिका क्षेत्रातील वास्तुविशारद आणि विकासक यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महानगरपालिका नेहमीच कटीबध्द असून त्यादृष्टीने ही कार्यशाळा लाभदायी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सॉफ्टटेकच्या वतीने श्री. निखिल कापसे, श्री. अंकित पटाणी व श्री. सचिन सिन्नकर यांनी या प्रणालीच्या वापराविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये ऑटो डिसीआरच्या संगणक प्रणालीमध्ये अद्ययावत अशा विशिष्ट बाबीबाबत माहिती दिली.
प्रीडीसीआर स्वतंत्र सॉफ्टवेअरमध्ये वास्तुविशारद जे ऑटोकॅड वापरतात त्या आवृत्तीशी सुसंगत असून ऑटो डिसीआऱ संगणक प्रणालीमध्ये सादर करण्यापूर्वी सदर नकाशे प्रमाणित करुन येतात, प्रत्येक प्रकल्पाचे रिअल-टाइम ट्रॅकिंग करता येते, सदर संगणक प्रणाली वापरकर्त्यांना कळायला व वापरायला सोपी आहे हे त्यांनी प्रात्यक्षिक स्वरुपात दाखवून दिले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे नगररचना विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले. बीपीएमएस संगणक प्रणालीसह सॉफ्टटेक कंपनीने तयार केलेली ऑटो डिसीआऱ प्रणालीदेखील नवी मुंबई महानगरपालिकेत वापरण्यास सुरवात करण्यात आलेली आहे.
Published on : 13-03-2023 09:12:21,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update