नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या प्रत्यक्ष पाहणी दौ-यातून शहर स्वच्छतेला गती

‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ च्या अनुषंगाने शहर स्वच्छतेचा आढावा घेत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी स्वच्छताविषयी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्ष पाहण्यासाठी आयुक्तांनी विभागवार दौ-यांना सुरुवात केली असून आज त्यांनी सकाळी 6.30 पासून दिघा व ऐरोली विभागातील विविध भागांना भेटी देत शहर स्वच्छतेची सद्यस्थिती प्रत्यक्ष जाणून घेतली. याप्रसंगी त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे उपस्थित होते.
दिघ्यापासून नवी मुंबईचे दक्षिणेकडील टोक असलेल्या दिघ्यापासून पाहणी दौ-यांना सुरुवात करीत आयुक्तांनी ईश्वरनगर येथील ठाणे महानगरपालिकेचा भाग व नवी मुंबई महानगरपालिकेचा भाग या सीमा रेषेवरील रस्त्यांवरील स्वच्छतेची बारकाईने पाहणी केली. शहरांमधील मुख्य रस्त्यांवर ज्या प्रमाणे स्वच्छतेमध्ये सुधारणा झालेली आढळते तशाच प्रकारची सुधारणा झोपडपट्टी भागातही असली पाहिजे असे निर्देश आयुक्तांनी कटाक्षाने स्वच्छताकर्मींना दिले.
झोपडपट्टी भागात घरातूनच ओला व सुका कचरा देण्याचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने कचरा वर्गीकरण प्रणालीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत तसेच क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी यांनी आपापल्या क्षेत्रातील झोपडपट्टी भागातील नागरिकांपर्यंत कच-याच्या वर्गीकऱणाविषयी व्यापक जनजागृती करावी व त्यांना वर्गीकरणाचे महत्व पटवून द्यावे आणि त्यांच्याकडून ते नियमितपणे करवून घ्यावे अशा सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.
झोपडपट्टी भागामध्ये सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांमध्ये सकाळच्या वेळेस अधिक वर्दळ असते याचे भान ठेवून संबंधित स्वच्छता निरीक्षकांनी त्याठिकाणी नियमित स्वच्छता राहील याकडे काटेकोर लक्ष द्यावे असे निर्देशित करतानाच आयुक्तांनी शौचालयांची आवश्यक डागडूजी तत्परतेने करून घ्यावी व त्याठिकाणी आवश्यक असणा-या वस्तू व साधणे नियमितपणे ठेवली जातील याकडेही लक्ष देण्याचे सूचित केले.
ठाणे बेलापूर मुख्य रस्त्यावर यांत्रिकी वाहनाने सफाई केली जात असली तरी रस्त्याच्या कडेला व त्याच्या सलग्न पदपथाच्या भागात पडलेला कचरा या वाहनावरील स्वच्छताकर्मीकडून नियमितपणे गोळा केला जाईल व त्याची वाहतूक केली जाईल याकडे बारकाईने लक्ष ठेवण्याचे आयुक्तांनी स्वच्छता निरीक्षकांना सूचित केले. त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यावर असलेल्या पादचारी पुलांखाली व आसपासच्या दुर्लक्षित जागांच्या सफाईकडेही नियमित लक्ष दिले जाईल याचे भान राखण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले.
दिघा, ऐरोली भागातील एमआयडीसी क्षेत्रातील सफाईची पाहणी करताना ब-याच मोकळ्या भूखंडांवर मातीचे आस्ताव्यस्त ढिगारे आढळून आल्याने याबाबत एमआयडीसी तसेच सिडको या प्राधिकरणांशी समन्वय साधून त्यांच्या मालकीच्या मोकळ्या भूखंडांवरील अस्वच्छतेमुळे शहर सौदर्याला बाधा पोहचते हे त्यांच्या लक्षात आणून देत तेथील साफसफाई कार्यवाही तत्परतेने करून घ्यावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
या पाहणी दौ-यात ठाणे बेलापूर रोडवर एके ठिकाणी एक व्यक्ती उघड्यावर लघुशंकेसाठी जाताना आढळल्याने त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करत 1 हजार रूपये दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात मोठ्या प्रमाणावर शौचालये तसेच मुतारी उभारल्या असून नागरिकांनी शहराची स्वच्छता व आरोग्य अबाधित राखण्यासाठी त्यांचा उपयोग करावा व शहराचे मानांकन अबाधित राखण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने पुन्हा एकवार करण्यात येत आहे.
सेक्टर 8 व सेक्टर 30 ए मधील हायटेंशन वायरखाली असलेल्या मोकळ्या भूखंडावर डेब्रीज आणून टाकले जात असून याविषयी विभाग अधिकारी यांना सतर्क राहण्याचे निर्देश देत आयुक्तांनी डेब्रीज टाकले जाऊ शकेल अशा प्रकारच्या मोकळ्या भूखंडांवर डेब्रीज भरारी पथकांनी अधिक काळजीपूर्वक लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ ला सोमोरे जाताना ‘निश्चय केला - नंबर पहिला’ हे आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने अधिक गतीमानतेने काम करायला सुरुवात केली असून त्याचा सकारात्मक परिणाम प्रत्यक्ष शहर स्वच्छतेवर दिसून येत आहेत. तथापी स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने कोणत्याही परिस्थितीत निष्काळजी न बनता सतत जागरूक राहून आपण करीत असलेल्या कामात अधिकाधिक सुधारणा करत रहावे असे निर्देश आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी दिले असून स्वत: आयुक्तच पाहणी करीत असल्याने संपूर्ण यंत्रणा सतर्क होऊन कामाला लागली आहे व याचे दृष्य परिणाम नवी मुंबई शहर स्वच्छतेवर दिसून येत आहेत.
Published on : 16-03-2023 11:19:56,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update