एन्फ्ल्यूएन्झा व कोव्हीड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे निर्देश
मागील काही दिवसांपासून देशातील अनेक भागात व शहरात सद्यस्थितीत नियंत्रणात आलेल्या कोव्हीड 19 आजाराचा प्रादुर्भाव व एन्फ्लुएन्झा (एच 3 एन 2) संसर्ग या दोन्ही आजारांचे वाढते रूग्ण दिसून येत असून त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग हा महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अलर्ट मोडवर आहे. सध्या उपचारासाठी येणा-या रुग्णांमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळत असून वातावरणातील झपाट्याने होत असलेल्या बदलांचा परिणामही प्रकृतीवर प्रभाव टाकताना दिसत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात एच 1 एन 1 च्या चाचण्या नोव्हेंबरपासून केल्या जात असून सदर चाचण्या निगेटिव्ह असल्याचे निदर्शनास येत आहे. तथापी नवी मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सतर्क असून एच 3 एन 2 किंवा ॲड्नोव्हायरसची शक्यता लक्षात घेऊन अधिक दक्षतेने चाचण्या केल्या जात आहेत.
महानगरपालिका कार्यक्षेत्रात जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत 19713 इतक्या फ्ल्यू सदृश्य रुग्णांची तपासणी करण्यात आलेली असून एच 3 एन 2 फ्ल्यू चा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
एन्फ्लुएन्झा आजाराचा संसर्ग एच 3 एन 2 या विषाणूमुळे होतो. फ्ल्यू सदृश्य लक्षणे असलेल्या रूग्णांमध्ये इतर कोणतेही निदान झाले नसल्यास एन्फ्ल्यूएन्झा करिता तपासणी करण्यात येते. अशा फ्ल्यू रुग्णांचे त्यांच्या लक्षणाच्या आधारे तीन गटांमध्ये वर्गीकरण करण्यात येते.
त्यापैकी सौम्य फ्ल्यू रुग्णांवर लक्षणानुसार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उपचार करण्यात येतो व अशा रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेऊन आवश्यकतेनुसार उपचार करण्यात येतात. अति जोखमीच्या घरगुती निकट सहवासितांवर विशेष लक्ष देण्याकरिता सल्ला देण्यात येऊन त्यांना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार देण्यात येतात.
मध्यम अथवा तीव्र स्वरुपाची फ्ल्यूची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना उपचाराकरिता महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली येथील सार्वजनिक रुग्णालयांमध्ये उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या रुग्णांचे प्रयोगशाळा नमुने सार्वजनिक रुग्णालय येथे गोळा करुन तपासणी करण्याची व्यवस्था सार्वजनिक रुग्णालय, नेरुळ येथे करण्यात आलेली आहे.
कोव्हीड 19 व एन्फ्लूएन्झा एच 3 एन 2 टाळण्यासाठी कोव्हीड कालावधीतील उपाययोजनांचा पुनर्उपयोग करणे आवश्यक आहे. त्याकरिता गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, साबण व स्वच्छ पाण्याने वारंवार हात धुवावेत, पौष्टिक आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी, धुम्रपान टाळावे अशी खबरदारी घ्यावी.
फ्ल्यू सदृश्य लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीस त्वरित नजिकच्या नमुंमपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सार्वजनिक रुग्ण्यालयांशी संपर्क साधण्याचा सल्ला द्यावा. शाळेत जाणारे विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेत काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांमध्ये फ्ल्यू सदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांनी आवश्यक वैदयकिय उपचार घ्यावेत व शक्यतोवर जनसंपर्क टाळावा. कोव्हीड 19 व एच 3 एन 2 या आजाराबाबत योग्य माहिती, योग्य वैदयकिय सल्ला व प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन या आजाराचा प्रसार थांबविण्याचे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 21-03-2023 14:30:03,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update