अग्निशमन सेवा सप्ताहनिमित्त विविध उपक्रमांव्दारे नवी मुंबई शहरात व्यापक जनजागृती
14 एप्रिल या अग्निशमन सेवा दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलाच्या वतीने वाशी अ्ग्निशमन केंद्रात नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या हस्ते अग्निविमोचन करताना शहिद झालेल्या अग्निशमन जवानांच्या स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्याचप्रमाणे अग्निशमन दिनापासून म्हणजेच 14 एप्रिल पासून 20 एप्रिल पर्यंत अग्निशमन सेवासप्ताहाचे आयोजन करून नागरिकांमध्ये अ्ग्निसुरक्षेविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली. यामध्ये अग्निशमन विभागाचे प्रमुख तथा अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड यांच्या नियंत्रणाखाली विभागीय अग्निशमन अधिकारी श्री. पुरुषोत्तम भोईर व त्यांच्या सहकार्यांनी उत्तम नियोजन करून जनजागृतीपर उपक्रमांचा कृती आराखडा तयार केला होता.
या अनुषंगाने 14 एप्रिल पासून 3 दिवस वाशी अग्निशमन केंद्रात अग्निशमन दलाकडील विविध उपकरणे व सुरक्षा साहित्याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाला शेकडो नागरिकांनी भेट देत अग्निशमन दलाकडील वेगळ्या प्रकारच्या उपकरणांची व साहित्यांची पाहणी करून माहिती जाणून घेतली.
अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त नागरिकांमध्ये अग्नि सुरक्षेची जाणीव जागृती व्हावी यादृष्टीने महानगरपालिका क्षेत्रातील विविध विभागात अग्नि विमोचनाची तसेच आग लागूच नये म्हणून बाळगावयाच्या खबरदारीची माहिती प्रात्यक्षिकांसह देण्यात आली.
प्रात्यक्षिकांसह झालेल्या मॉकड्रिल नवी मुंबई महानगरपालिकेच्या 5 अग्निशमन केंद्रांमार्फत आपापल्या विभागात वर्दळीच्या व महत्वाच्या ठिकाणी घेण्यात आल्या. यामध्ये इनॉर्बींट मॉल, फोर्टीज हॉस्पिटल, बीआरसीए ब्राईड तुर्भे (डिपार्टमेंट ऑफ ॲटोमिक एनर्जी), सीवूड मॉल, अलकनंदा सोसायटी, नेरुळ रेल्वेस्टेशन परिसर, सीबीडी बेलापूर रेल्वेस्टेशन परिसर, डी मार्ट सीवूड, नमुंमपा शाळा सेक्टर 8 सीबीडी बेलापूर, माता बाल रुग्णालय बेलापूर गांव, लायन्स हॉस्पिटल सेक्टर 7 कोपरखैरणे, डी मार्ट सेंक्टर 10 ऐरोली, ओजस सोसायटी सेंक्टर 20 ऐरोली, लिटील एन्जल फाऊंडेशन सेक्टर 14 ऐरोली अशा शहराच्या विविध भागातील विविध प्रकारच्या संस्था, परिसर, सोसायट्या, रुग्णालये, रेल्वेस्टेशन, मॉल अशा विविध ठिकाणी अग्नि सुरक्षेची प्रात्यक्षिकांसह मॉकड्रिल करण्यात आली. या प्रात्यक्षिकांमध्ये उपस्थितांपैकी काही जणांना प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी करून घेण्यात आले.
या सर्वच ठिकाणी नागरिकांची उत्सुकतेने मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अग्निशमन सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या ठिकाणी अग्निसुरक्षेविषयी नागरिकांमध्ये करण्यात आलेल्या जनजागृतीचे चांगले उपक्रम यापुढील काळातही सुरु ठेवावेत अशा सूचना आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी अग्निशमन विभागास दिल्या. नागरिकांनीही आग लागूच नये व आपत्ती उद्भवू नये यादृष्टीने आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी केलेले आहे.
Published on : 20-04-2023 09:39:40,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update