बीएएसएफ कंपनीच्या सीएसआर निधीतून स्वच्छताकर्मींची उन्हाळ्यात काळजी घेत सुरक्षा साहित्य प्रदान
उन्हाचा वाढता ताप लक्षात घेता उन्हातान्हात शहर स्वच्छतेचे काम करणा-या स्वच्छताकर्मींविषयी आपुलकी प्रकट करीत सामाजिक बांधिलकी जपत तुर्भे येथील बीएएसएफ कंपनीने आपल्या सामाजिक दायित्व निधीतून अर्थात सीएसआर फंडातून तुर्भे विभाग कार्यक्षेत्रात स्वच्छतेची काळजी घेणा-या स्वच्छताकर्मींना गावस्कर टोपी म्हणून प्रसिध्द असणा-या राऊंड कॅप तसेच रिफ्लेक्टर जॅकेट हे सुरक्षा साहित्य प्रदान केले. याव्दारे रस्त्यावर साफसफाईचे काम करित असताना कामगारांना सुरक्षितपणे काम करता येईल तसेच ऊन लागण्यापासून त्यांचे संरक्षण होईल.
यावेळी तुर्भे विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. भरत धांडे यांच्या समवेत मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे, तुर्भे विभागाचे स्वच्छता अधिकारी श्री. सुधाकर वडजे तसेच बीएएसएफ कंपनीचे साईट हेड श्री. राजीव नाईक, व्यवस्थापक श्री. सचिन जोशी, एचआर श्रीम. आयुषी गुप्ता, श्रीम. संध्या रामास्वामी, श्री. के. एम. गुप्ता आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी तुर्भे विभागातील सर्व स्वच्छतामित्रांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच रिफ्लेक्टर जॅकेट परिधान करण्याचे महत्व विषद करण्यात आले. येत्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ मध्ये ‘निश्चय केला - नंबर पहिला’ हे आपले घोषवाक्य प्रत्यक्षात उतरविण्याचा एकमुखाने निर्धार करण्यात आला. याप्रसंगी तुर्भे विभागातील सर्व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.
Published on : 26-04-2023 12:58:26,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update