नियमित लसीकरण व पल्स पोलिओ लसीकरणाबाबत सिटी टास्क फोर्स बैठकीत कृतीशील कार्यवाहीचे निर्देश
नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने नियमित लसीकरण तसेच विविध लसीकरण मोहींमा राबविल्या जात असून या मोहीमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता टास्क फोर्स कार्यान्वित आहे. अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली नियमित लसीकरण व पल्स पोलिओ लसीकरण मोहीम टास्क फोर्सची विशेष सभा नुकतीच आयोजित करण्यात आली. याप्रसंगी आय.ए.पी प्रेसिडेंट, एस.एम.ओ डब्ल्यूएचओ, आयसीडीएस, सीडीपीओ यांचे प्रतिनिधी (शहरी, ग्रामीण, ठाणे पनवेल), नमुंमपा रुग्णालयांचे प्रमुख व सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
या सभेमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी नियमित लसीकरणामध्ये नमुंमपाच्या सद्यास्थितीविषयी माहिती दिली आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेकरिता नमुंमपाने केलेले नियोजन सांगितले. डॉ.अरुण काटकर, एस.एम.ओ.डब्ल्यूएचओ यांनी नियमित लसीकरणात व पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेमध्ये पर्यवेक्षण व नियंत्रणामध्ये आढळलेल्या बाबी व पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेविषयी शासनामार्फत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सादरीकरण केले.
एकही बालक नियमित लसीकरणापासून वंचित राहणार नाही या अनुषंगाने लाभार्थी यादी अद्ययावत करण्याबाबत अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे यांनी निर्देश दिले तसेच लसीकरणाची टक्केवारी वाढविण्याकरिता विशेष लक्ष द्यावे आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्याकरिता मनुष्यबळाच्या मदतीने आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना केल्या.
Published on : 10-05-2023 13:33:24,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update