*पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी दक्ष राहण्याचे नमुंमपा आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांचे निर्देश*
*पावसाळा कालावधीला सुरुवात झाली असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागासह सर्वच विभागांनी दक्ष राहून आपापली जबाबदारी पार पाडावी व महानगरपालिका क्षेत्रातील पोलीस, वाहतुक पोलीस, सिडको, एमएसईडीसीएल, एमआयडीसी अशा विविध प्राधिकरणांशी कायम संवादी राहून परस्परांशी समन्वय राखत नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काटेकोर काळजी घेण्याचे निर्देश नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी पावसाळी कालावधीच्या अनुषंगाने दिलेले आहेत.*
*शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकांमधून पावसाळापूर्व कार्यवाहीचे नियोजन*
नवी मुंबई शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख म्हणून यापूर्वीच महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी वेळोवेळी समन्वय बैठका घेऊन प्रत्येक प्राधिकरणाने पावसाळापूर्व कामे जलद पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नैसर्गिक नालेसफाई, बंदिस्त गटारे सफाई, मलनि:स्सारण वाहिन्यांची स्वच्छता यांचे दौरे करत प्रत्यक्ष पाहणी केली होती व महत्वाच्या सूचना केल्या होत्या. आयुक्तांनी स्वत: पाहणी केल्यामुळे पावसाळापूर्व कामांना गती लाभली.
*पावसाला सुरुवात झाल्यापासून सर्व यंत्रणांना दक्षतेचे आदेश*
13 जून रोजी संध्याकाळपासून मोठ्या पावसाला सुरुवात झाल्यानंतर आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना अधिक प्रमाणात पडणारा पहिलाच पाऊस असल्याने सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश दिले. पावसाच्या पाण्याचा योग्य रितीने निचरा होत असल्याबाबत खात्री करून घेण्याचे विभाग कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातील अधिकारी, कर्मचारी यांना निर्देशित करण्यात आले.
*नमुंमपा क्षेत्रात 24.11 मि.मि. तसेच मोरबे धरण क्षेत्रात 6.40 मि.मि. पर्जन्यवृष्टी*
13 जून रोजी सकाळी 8.30 ते 14 जून रोजी सकाळी 8.30 पर्यंत नमुंमपा क्षेत्रात सरासरी 24.11 मि.मि. पावसाची नोंद झालेली असून यामध्ये बेलापूर विभागात 16.60 मि.मि., नेरुळ विभागात 23.40 मि.मि., वाशी विभागात 14.40 मि.मि., कोपरखैरणे विभागात 22.70 मि.मि., ऐरोली विभागात 33.60 मि.मि., दिघा विभागात 34 मि.मि. पावसाची नोंद झालेली आहे. मोरबे धरण परिसरातही 6.40 मि.मि. इतक्या पावसाची नोंद झाली असून मोरबे धरणाची पातळी 69.39 मीटर इतकी झालेली आहे.
*सर्व नियंत्रण कक्ष सुसज्ज व दक्ष राहतील याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश*
यापुढील काळात आठही विभाग कार्यालयातील तसेच 5 अग्निशमन केंद्रांमधील आपत्ती नियंत्रण कक्ष अधिक दक्षतेने कार्यरत राहतील याची विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त तसेच विभागनिहाय नेमलेले नोडल अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. कोणतीही आपत्ती सांगून येत नाही त्यामुळे कायम दक्ष राहणे अत्यंत गरजेचे असून परिस्थितीनुसार मदतकार्याची सज्जता ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
*पावसाळी कालावधीत मोबाईल बंद राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना*
विभागप्रमुखांसह सर्व अधिका-यांनी आपले मोबाईल फोन सुरु राहतील याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देतानाच विशेषत्वाने रात्रीच्या वेळी कोणत्याही परिस्थितीत फोन बंद राहणार नाहीत याकडे काटेकोर लक्ष देण्याचे आयुक्तांनी आदेशित केले. याबाबत कोणत्याही सबबी चालणार नाहीत अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिलेल्या आहेत.
पाणी साचण्याच्या संभाव्य 14 ठिकाणी पाणी उपसा पंपांची व्यवस्था व त्यासाठी आवश्यक इंधनाची व्यवस्था करून ठेवावी, नागरिकांना स्थलांतरित करावयाचे झाल्यास त्यांच्यासाठी तात्पुरत्या स्वरुपातील निवा-याची व्यवस्था सज्ज ठेवावी, त्यांना द्यावयाच्या अन्नपाण्याची व्यवस्थाही करावी अशा विविध आवश्यक गोष्टींबाबत पूर्वतयारी करून ठेवण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.
*अडचणीच्या प्रसंगी मदतकार्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन*
*नवी मुंबई महानगरपालिका आणि क्षेत्रातील विविध प्राधिकरणे परस्पर समन्वय राखत पावसाळी कालावधीकरिता सज्ज असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अडचणीच्या प्रसंगी गरज भासल्यास आपल्या नजीकच्या विभाग कार्यालयात 24 तास सुरु असलेल्या आपत्ती नियंत्रण कक्षाशी अथवा नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील तात्काळ कृती केंद्राशी 27567060 / 7061 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 1800222309 / 2310 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी केले आहे.*
Published on : 14-06-2023 13:10:55,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update