भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक नागरिकांसाठी मंगळवार ते रविवार खुले, सोमवारी बंद मागील दीड वर्षात 589 दिवसांत 1 लक्ष 77 हजार 373 नागरिकांनी दिली भेट
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 15 ऐरोली येथे ऐरोली – मुलुंड खाडीपूलानजिक उभारण्यात आलेले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यतम स्मारक बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांचा जागर करणारे ज्ञानस्मारक म्हणून नावाजले जात आहे.
देशापरदेशातील बाबासाहेबांच्या विविध स्मारकांमध्ये या स्मारकाचे वेगळेपण स्मारकाला भेट देणा-या प्रत्येक मान्यवर व्यक्तीने आवर्जून सांगितले असून लक्षावधी नागरिकांनी याठिकाणी भेट देत येथील सुविधांचे कौतुक केले आहे.
याठिकाणी आधुनिक ई लायब्ररी सुविधेसह असलेले सुसज्ज ग्रंथालय, बाबासाहेबांच्या जीवन चरित्राचे दर्शन घडविणारे दुर्मीळ छायाचित्र दालन, बाबासाहेबांच्या भाषणाचा प्रत्यक्ष अनुभव देणारे होलोग्राफीक प्रेझेन्टेशन, भव्य ध्यानगृह (मेडिटेशन सेंटर), अत्याधुनिक सभागृह अशा अत्युत्तम सुविधांव्दारे या स्मारकाने मागील दीड वर्षात लोकांच्या मनात आदराचे आणि आपुलकीचे स्थान निर्माण केलेले आहे. येथे येणारा प्रत्येक माणूस भारावून गेलेला आहे आणि प्रत्येकाने आपल्या संपर्कात येणा-या अनेक जणांना या स्मारकाला आवर्जून भेट द्या असे आग्रहाने सांगितले आहे.
भारतरत्न डॉ़. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला 5 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा तत्कालीन ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते स्मारकातील सुविधांचे लोकार्पण होऊन स्मारक जनतेसाठी खुले करण्यात आले. तेव्हापासून मागील 1 वर्ष 7 महिने 10 दिवसांच्या कालावधीत म्हणजेच 589 दिवसात या स्मारकाला 1 लक्ष 77 हजार 373 नागरिकांनी नोंद करून भेट दिलेली आहे. विशेषत्वाने शनिवार व रविवारी नागरिकांचा स्मारक बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ओघ असतो.
मागील दोन वर्षांतील महापरिनिर्वाण दिन तसेच जयंतीदिनीच्या दिवशी तर एका दिवसात सात ते दहा हजाराहून अधिक नागरिकांनी स्मारकाला नोंद करून भेट दिलेली आहे. त्या दिवसांच्या गर्दीत प्रत्येकाची नोंदणी करणे शक्यच झाले नाही इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. या सर्वांसाठी महानगरपालिकेमार्फत अल्पोपहार व चहापान व्यवस्था करण्यात आलेली होती. यामध्ये केवळ भीम अनुयायीच नव्हे तर बाबासाहेबांच्या विचारांना मानणा-या सर्वच समाज घटकांचा समावेश असतो.
हे स्मारक बाबासाहेबांच्या ज्ञानसूर्य उपमेला साजेसे असावे यादृष्टीने येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याखाने आयोजित करून एक वैचारिक विचारपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्यामध्ये ‘विचारवेध’ शिर्षकांतर्गत महापुरूषांच्या जयंती, स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या विचारांवर आधारित व्याख्यानांचे आयोजन केले जाते तसेच बाबासाहेबांचा जयंती उत्सव “जागर” या व्याख्यानमालेच्या स्वरूपात आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा केला जात आहे.
स्मारकामध्ये आत्तापर्यंत डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. सुखदेव थोरात, डॉ.रावसाहेब कसबे, श्री.उत्तम कांबळे, श्री.गिरीश कुबेर, श्री. राजीव खांडेकर, श्री. हरी नरके, श्री. नागराज मंजुळे, श्री. राहुल सोलापूरकर, डॉ.गणेश चंदनशिवे, श्री.अरविंद जगताप, श्री. योगीराज बागुल अशा अनेक मान्यवर वक्त्यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. त्याला नागरिकांचा विलक्षण उत्साही सहभाग लाभत आहे. देशापरदेशातील नागरिकांनीही विविध समाज माध्यमांव्दारे या कार्यक्रमांचा ऑनलाईन लाईव्ह अनुभव घेतला आहे. स्मारकाच्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम पेजचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यातूनही स्मारकाची महती सर्वदूर पोहचविली जात आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत नागरिकांकरिता खुले असते. स्मारकाची देखभाल - दुरूस्ती व्यवस्थित रितीने होण्याकरिता यापुढील काळात आठवड्यातील 1 दिवस म्हणजेच सोमवारी स्मारक बंद असणार आहे. स्मारकातील प्रवेशासाठी नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचे प्रवेशशुल्क आकारले जाणार नसून स्मारकात खाद्यपदार्थ घेऊन जाण्यासाठी मनाई आहे.
केवळ नवी मुंबई शहराच्याच नाही तर राज्याच्या आणि देशाच्या नावलौकिकात भर घालणारे, सेक्टर 15 ऐरोली नवी मुंबई येथील नवी मुंबई महानगरपालिकेचे ‘ज्ञान हीच शक्ती’ या बाबासाहेबांच्या विचारांना अग्रस्थान देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे ज्ञानस्मारक म्हणून सर्वत्र नावाजले जात आहे. प्रत्येक नागरिकाने या ठिकाणी भेट देऊन विशेषत्वाने येथील समृध्द ग्रंथालयाला तसेच दुर्मीळ छायाचित्र दालनाला भेट द्यावी व बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची व्यापकता आणि विचारांची उत्तुंगता अनुभवावी असे आवाहन नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 17-07-2023 12:47:25,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update