'माझी माती माझा देश' अभियानांतर्गत नवी मुंबईत विविध कार्यक्रमांच्या आयोजनाची तयारी
.jpeg)
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता 30 ऑगस्टला होत असून 9 ते 14 ऑगस्ट या कालावधीत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 'माझी माती माझा देश (Meri Maati Mera Desh)' हे अभियान मा.पंतप्रधान ना. श्री. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे. महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान लोकसहभागातून व्यापक स्वरूपात राबवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण तयारी केली आहे.
आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वीच प्राथमिक बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर शासनामार्फत प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने विशेष नियोजन बैठक आयोजित करीत आयुक्तांनी अभियानांतर्गत करावयाच्या विविध कार्यक्रमांविषयी सविस्तर चर्चा केली व कामाच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार माझी माती माझा देश अभियानांतर्गत जलस्त्रोतांशेजारी शिलाफलक उभारण्यात येणार असून या शिलाफलकावर देशाच्या रक्षणार्थ बलिदान दिलेल्या स्थानिक शहीद वीरांची नावे कोरली जाणार आहेत. त्याचप्रमाणे पंचप्राण शपथ घेतली जाणार असून नागरिकांनी अभियानाच्या विशेष वेबसाईटवर सेल्फी अपलोड करून मातृभूमी विषयीची तसेच वीरांविषयीची आदराची भावना अभिव्यक्त करावयाची आहे. त्याचप्रमाणे वसुधा वंदन, वीरों को नमन, ध्वजारोहण व राष्ट्रगान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाणार आहे. शासनामार्फत कार्यक्रमाचा दिनांक सूचित करण्यात आल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागावर भर देत या कार्यक्रमाचे व्यापक स्वरूपात आयोजन केले जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांसह खाजगी शाळांमध्येही हा उपक्रम राबविला जाणार असून तशा प्रकारचे निर्देश आयुक्तांनी शिक्षण विभागास दिले.
या आयोजनाविषयीची पूर्वतयारी करून ठेवण्याचे संबंधित विभागांना निर्देश देत आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी या कार्यक्रमाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बॅनर, होर्डिंग, माहितीपत्रके, फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम व्हाॅट्सअप अशा विविध समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर प्रभावी वापर करावा असे निर्देश दिले. शासनामार्फत प्राप्त अभियानाच्या डिझाईन्सला डिजिटल माध्यमातून प्रसिद्धी देण्यात यावी तसेच एनएमएमटी बसेस आणि बस स्टॉप यावरही अभियानाची व्यापक प्रसिद्धी करावी असे आयुक्तांनी निर्देशित केले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री शरद पवार, अभियानाच्या नोडल अधिकारी तथा क्रीडा विभागाच्या उपायुक्त श्रीम मंगला माळवे, शहर अभियंता श्री संजय देसाई, समाज विकास विभागाचे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार, परिमंडळ १ उपायुक्त श्री सोमनाथ पोटरे, परिवहन व्यवस्थापक श्री योगेश कडूसकर, शिक्षण उपायुक्त श्री दत्तात्रय घनवट, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
आपल्या देशाविषयी, मातृभूमीविषयी आपल्या मनात असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी तसेच आपल्या वीर शहीद योद्ध्यांच्या समर्पणाचे आदरभावाने स्मरण करता यावे यादृष्टीने स्वातंत्र्याच्या अमृत महात्सवाचे औचित्य साधून संपूर्ण देशभरात आयोजित करण्यात आलेला 'माझी माती माझा देश' हा उपक्रम प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीने अभिमानाचा असून सर्व नवी मुंबईकर नागरिकांनी नवी मुंबई महानगरपालिका लवकरच जाहीर करील त्यादिवशी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा त्याचप्रमाणे मागील वर्षीप्रमाणे घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत याही वर्षी भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या घराघरावर तिरंगा ध्वज फडकवून राष्ट्राभिमानाचे दर्शन घडवावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 07-08-2023 09:28:23,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update