नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन पूर्वबैठक संपन्न

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शालेय क्रीडा स्पर्धांना स्वतंत्र जिल्हयाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यास अनुसरून सन 2009-2010 पासून नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने मागील 11 वर्षे जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे यशस्विरित्या आयोजन करण्यात येत आहे.
सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षात शासन मान्यताप्राप्त अनुदानित 46 क्रीडाप्रकार आणि विना अनुदानित 44 क्रीडाप्रकार अशा तब्बल 90 क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धांच्या सुनियोजित आयोजनाच्या दृष्टीने पूर्वतयारी म्हणून नमुंमपा कार्यक्षेत्रातील शासन मान्यताप्राप्त अनुदानित व विना अनुदानित सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांचे प्राचार्य, मुख्याध्यापक आणि क्रीडा शिक्षक यांच्यासमवेत विचारविनीमय बैठकीचे आयोजन वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आले होते.
क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त श्रीम. ललिता बाबर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 225 शाळांतील क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते. या स्पर्धेत जास्तीत जास्त शाळांनी सहभागी होण्याच्या दृष्टीने स्पर्धा प्रवेशापासून ते प्रमाणपत्रापर्यंत कागदपत्र विषयक सर्व बाबी ऑनलाईन प्रणालीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. या ऑनलाईन प्रणालीचे उजळणी प्रशिक्षण आणि नव्याने समाविष्ट केलेल्या बाबींची माहिती या बैठकीत उपस्थितांना देण्यात आली.
या स्पर्धा नियोजन बैठकीप्रसंगी नमुंमपा क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त श्रीम. ललिता बाबर यांनी महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच शाळांना या स्पर्धांव्दारे मोठी संधी मिळालेली असून त्याचा फायदा प्रत्येक शाळेतील खेळामध्ये रुची असलेल्या होतकरु खेळाडूंना मिळाला पाहिजे याकरिता शाळांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. नवी मुंबई हे सुनियोजित शहर म्हणून ओळखले जाते. येथील प्रत्येक नोडमध्ये खेळाची मैदाने आरक्षित करुन ठेवलेली आहेत. शहरामध्ये विविध खेळाच्या सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत, याची कल्पना आम्हांला आहे. त्यादृष्टीने आगामी काळात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्धतेसाठी संपूर्ण क्षमतेने प्रयत्न् करण्यात येतील असे सांगत उपायुक्त श्रीम. ललिता बाबर यांनी शहरातील कोणत्याही शाळेमध्ये क्रीडा प्रशिक्षणाची आवश्यकता भासत असेल, विशेष करुन ॲथलेटिक्सकरिता तेंव्हा थेट मला संपर्क करावा, मी स्वत: प्रशिक्षणासाठी मदत करेन आणि क्रीडाविषयक अडचणी सोडवीन अशी ग्वाही दिली. या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त खेळांडूनी सहभागी व्हावे व शाळांनी त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत असे सांगत त्यांनी स्पर्धेकरिता भरभरून शुभेच्छा दिल्या.
या बैठकीस ठाण्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम. सुवर्णा बारटक्के व क्रीडा अधिकारी श्रीम. सुचिता ढमाले, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीम.मधुरा सिंहासने, नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी श्रीम. अभिलाषा पाटील व श्री.रेवप्पा गुरव, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. सुलभा बारघरे, स्पर्धा आयोजन समिती सदस्य श्री. धनंजय वनमाळी, श्री.सुधीर थळे, श्री. पुरुषोत्तम पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.
Published on : 22-08-2023 16:05:39,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update