बालकर्करोगाविषयी जनजागृतीकरिता नमुंमपा आयकॉनिक मुख्यालय वास्तूस सोनेरी रोषणाई
‘सप्टेंबर‘ हा महिना ‘बाल कर्करोग जागरूकता महिना‘ म्हणून संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. या बाल कर्करोग जागरूकता महिन्यामध्ये लहान मुलांमधील कर्करोगाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी तसेच त्याची कारणे, प्रतिबंध, निदान आणि उपचार याच्या संशोधनाकरिता निधी उभारण्यासाठी प्रमुख बाल कर्करोग संस्थेव्दारे वार्षिक आंतरराष्ट्रीय आरोग्य मोहीम राबविण्यात येते.
लहान मुलांमधील कॅन्सर हा योग्य वेळेत उपचार केल्यास पूर्णतः बरा होऊ शकतो हा संदेश जास्तीत जास्त प्रमाणात सर्वदूर पोहचण्यासाठी बाल कर्करोग जागरूकता महिना साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने जगभरात ज्या लक्षवेधी वास्तू आहेत त्यांच्यावर सोनेरी रंगाची विद्युत रोषणाई करण्यात येते. या माध्यमातून बाल कर्करोगग्रस्त मुलांकरिता व त्यांच्या कुटुंबाकरिता #GoGold असा संदेश देऊन त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा तसेच समाजात बाल कर्करोगाविषयी जागरूकता पसरवण्यात येते.
या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग जागरूकता महिन्याचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयकॉनिक अशा मुख्यालय वास्तूस 4 व 5 सप्टेंबर 2023 रोजी सोनेरी रंगाची विद्युत रोषणाई करून बाल कर्करोगाविषयी जनजागृती करण्यात आलेली आहे.
Published on : 06-09-2023 13:25:43,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update