अखंड विद्यार्थीपण जपता येते त्यांच्याच शिक्षकपणाचा विस्तार होतो - प्रा.प्रवीण दवणे
विविध प्रसार माध्यमांच्या विळख्यातून नव्या पिढीला स्वच्छ वाटेवर नेण्याचे आव्हान आजच्या शिक्षकांसमोर असून प्रकाश दाखवणाऱ्या दीपज्योतीसारख्या असलेल्या वाचनाची गोडी लावून सांस्कृतिक आरोग्य पेरण्याचे काम शिक्षकांनी करावे असा संदेश सुप्रसिद्ध साहित्यिक, वक्ते प्रा. प्रवीण दवणे यांनी शिक्षकदिनाच्या निमित्ताने दिला.
नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शिक्षकदिनाचे औचित्य साधून आयोजित विशेष कार्यक्रमाप्रसंगी 'अध्यापनातले दीपस्तंभ' या विषयावर प्रा. प्रवीण दवणे यांनी उपस्थित शिक्षकांशी दिलखुलास संवाद साधला.
दीपस्तंभ दिसणे ही काळोख दूर होण्याची सुरुवात असते असे सांगत प्रा.प्रवीण दवणे यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी कथन करीत आज तुम्ही - आम्ही जे काही आहोत ते त्या काळातील शिक्षकांमुळे असे सांगितले.
अखंड विद्यार्थीपण ज्याला जपता येते त्याचाच शिक्षकपणाचा विस्तार होतो असे सांगताना शिक्षकाची नोकरी कागदावर असते पण व्रत काळजावर जपावे लागते असे मत व्यक्त करीत त्यांनी मनाचा टीपकागद सतत जागा ठेवा आणि नवनवीन माहिती, ज्ञान घेऊन अद्ययावत रहा असा संदेश दिला.
ज्याला आपले वय आणि मनस्थिती पुसता येते तो आदर्श शिक्षक असे सांगताना प्रा. प्रवीण दवणे यांनी स्वतःचा मूड बाहेर ठेवून हसतमुखाने वर्गावर जा, मग बघा, ते विद्यार्थी तुम्हाला जन्मभर पुरणारा आनंद देतील असा मंत्र दिला.
शिक्षक विद्यार्थ्यांमुळे पूर्ण होतो, त्यामुळे आजच्या शिक्षकदिनी विद्यार्थ्याचा गौरव करणे महत्वाचे वाटते असे सांगत प्रा.प्रवीण दवणे यांनी माझे शिक्षकपण पूर्ण करणारा विद्यार्थी, महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांना स्वतःचा 'मौनदाह' काव्यसंग्रह देऊन सन्मानित केले.
पुस्तक वाचनाने सर्वांगीण विकास होतो त्यामुळे मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असे सांगतानाच मुलांना वाचणारे शिक्षक, आई-बाबा दिसले पाहिजेत तर त्यांना वाचनाचे महत्त्व जाणवेल असेही ते म्हणाले.
समर्पणाचे, निष्ठेचे कोचिंग क्लासेस नसतात त्यासाठी आपणच आपल्याला तपासायचे असते असे सांगताना प्रा. प्रवीण दवणे यांनी आत्मविश्वासासारखी दुसरी शक्ती नाही व ती दीर्घोद्योगामुळे वाढते असा संदेश देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 'सामाजिक आचार्य' असा गौरव केला.
सध्या स्वामी विवेकानंदांचे 'मनुष्यत्वाचा विकास म्हणजे शिक्षण' असे प्रेरणादायी विचार नव्या पिढीच्या मनात रुजवणारा 'तेजाकडून तेजाकडे' हा कार्यक्रम सामाजिक जाणीवेच्या उद्देशाने करत असल्याचे सांगत प्रा. प्रवीण दवणे यांनी कागदावर पर्मनंट झालो म्हणजे शिक्षक झालो असे नाही तर मुलांच्या काळजावर पर्मनंट व्हा अशा शब्दात शिक्षकांना प्रोत्साहित केले.
प्रा. प्रवीण दवणे यांच्या शुभहस्ते स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनी पुष्पमालिका अर्पण करून प्रतिमापूजन करण्यात आले. शिक्षण विभागाचे उपायुक्त श्री. दत्तात्रय घनवट यांच्या शुभहस्ते प्रा प्रवीण दवणे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी श्रीम. अरूणा यादव उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 42, घणसोलीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाची सुरेल सुरुवात केली.
ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ, सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे आणि मान्यवरांच्या शुभहस्ते गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
Published on : 08-09-2023 15:28:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update