नवी मुंबई इको नाइट्स संघात सहभागाचे सोसायटी बैठकीत उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांचे आवाहन
‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग 2.0’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘नवी मुंबई इको नाईट्स’ हा संघ सहभागी झाला असून महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
12 सप्टेंबर रोजी आयुक्तांच्या शुभहस्ते ‘नवी मुंबई इको नाइट्स 2.0’ संघाचे बोधचिन्ह अनावरण करण्यात आले असून या संघाचे कर्णधारपद सुप्रसिध्द संगीतकार गायक तथा स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ब्रँड ॲम्बेसेडर श्री. शंकर महादेवन भूषवित आहेत. 17 सप्टेंबर रोजी संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात 8 विभागांमध्ये 8 ठिकाणी त्या त्या क्षेत्रातील विदयार्थी, युवक, महिला व पुरुष नागरिक एकत्र जमून सकाळी ठीक 8.00 वा. स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण करणार आहेत.
या निमित्ताने नागरिकांमध्ये स्वच्छताविषयक जनजागृती करण्यासाठी व त्यांच्यापर्यंत इंडियन स्वच्छता लीग 2.0 याविषयीची माहिती पोहचविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी विविध सोसायटयांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत.
या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी एनआरआय सोसायटी से-56 सीवूड्स, कोकण रेल्वे कॉलनी से-40 बेलापूर, निलसिध्दी अटलांटिस अपा. से-29 नेरुळ, शिव पाम बीच सोसायटी से.4 नेरुळ या चार सोसायटयांमध्ये प्रत्यक्ष भेट देत तेथील सोसायटी सभागृहात नागरिकांशी सुसंवाद साधला.
यावेळी त्यानी ‘इंडियन स्वच्छता लीग 2.0’ अंतर्गत 17 सप्टेंबरला विभागवार होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली व आपल्या नवी मुंबई शहराच्या स्वच्छतेविषयीची मनात असलेली आत्मियता आणि एकात्म भावना प्रदर्शित करण्यासाठी सोसायटीतील प्रत्येक नागरिकाने आपल्या निवासाजवळच्या जाहीर केलेल्या ठिकाणी उपस्थित राहून सामुहिक स्वच्छता शपथ या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
बेलापूर विभागामधील सोसायटी सदस्यांनी पिपल्स एज्युकेशन सोसायटी शाळा मैदान, से-1 सीबीडी बेलापूर तसेच नेरुळ विभागातील सोसायटी सदस्यांनी ज्वेल ऑफ नवी मुंबई से-26 नेरुळ येथील सामुहिक शपथ ग्रहण कार्यक्रमात सहभागी व्हावे असे त्यांनी सांगितले.
यावर्षी लीगमध्ये देशातील चार हजारहून अधिक शहरे सहभागी झाली असून मागील वर्षी सर्वाधिक युवक सहभागाचे देशातील प्रथम क्रमांकाच्या शहराचे मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झाले होते. हे मानांकन कायम राखण्याची आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी असून ती ओळखून नवी मुंबईकर नागरिक या उपक्रमात मोठया संख्येने सहभागी होतील असा विश्वास उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी कचऱ्याचे ओला, सुका व घरगुती घातक अशा तीन प्रकारे घरातच वर्गीकरण करणे, हा वर्गीकरण केलेला कचरा घंटागाडयांमध्ये वेगवेगळा देणे, ‘थ्री आर’ ची प्रभावी अंमलबजावणी करणे या बाबी काटेकोरपणे नियमित अंमलात आणाव्यात असेही आवाहन केले.
इंडियन स्वच्छता लीग 2.0 अंतर्गत ‘नवी मुंबई इको नाइट्स’ या नवी मुंबईच्या संघात सहभागाकरिता ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून https:/innovateindia.mygov.in/islseason2/ या वेब लिंकवर क्लिक करुन व त्यामध्ये माहिती भरुन आपल्या नवी मुंबई संघाचे सदस्य व्हावे असे आवाहन उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी केले.
स्वच्छ चित्रकला स्पर्धेचेही 15 सप्टेंबरला सर्व शाळांमध्ये आयोजन – 1.5 लाखाहून अधिक विद्यार्थी सहभाग
याशिवाय लीग अंतर्गत दि 15 सप्टेंबर 2023 रोजी शालेय स्तरावर स्वच्छ चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये दीड लाखाहून अधिक विदयार्थी चित्रकार आपापल्या शाळांमधून सहभागी होणार आहेत. इयत्ता पहिली ते चौथी, इयत्ता पाचवी ते आठवी तसेच इयत्ता नववी ते दहावी अशा तीन गटांमध्ये ही स्वच्छ चित्रकला स्पर्धा संपन्न होणार असून सर्वोत्कृष्ट चित्रांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या करीता विदयार्थी चित्रकारांनी आपापल्या शाळेमार्फत वेब लिंकवरील सहभाग फॉर्म भ्ररुन या चित्रकला स्पर्धेत सहभागी व्हायचे असून आपले कलागुण प्रदर्शित करावयाचे आहेत.
स्वच्छ शहर ही नवी मुंबईची ओळख असून या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून नवी मुंबईत स्वच्छतेचा एकमुखाने जागर व्हावा व या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ उभी राहावी आणि त्यामध्ये संपूर्ण शहर एकत्रितपणे सहभागी व्हावे ही भूमिका नजरेसमोर ठेवून आठही विभागांमध्ये रविवारी 17 सप्टेंबरला सकाळी 8.00 वाजता एकाचवेळी सामुहिक स्वच्छता शपथ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाने ‘माझे स्वच्छ शहर, माझी जबाबदारी’ या भावनेतून स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Published on : 14-09-2023 15:27:24,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update