“पुढल्या वर्षी लवकर या” नामगजरात अनंतचतुर्दशीदिनी 8641 श्रीगणेशमूर्तींना भावपूर्ण निरोप





“गणपतीबाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या” अशा नामगजरात नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सर्व 22 नैसर्गिक आणि 141 कृत्रिम अशा एकूण 163 विसर्जन स्थळांवर करण्यात आलेल्या उत्तम व्यवस्थेमुळे अनंतचतुर्दशीदिनी पहाटे 4 वाजेपर्यंत चाललेला विघ्नहर्त्या श्रीगणरायाचा विसर्जनसोहळा निर्विघ्नपणे संपन्न झाला. महानगरपालिका क्षेत्रात एकूण 519 सार्वजनिक व 8122 घरगुती अशा एकूण 8641 श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन अत्यंत उत्साहात संपन्न झाले.
अनंतचतुर्दशीदिनी होणा-या श्रीमूर्ती विसर्जनामध्ये सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या आकाराच्या गणेशमूर्तींचा समावेश असल्यामुळे सर्व 22 नैसर्गिक विसर्जनस्थळांवर मोठ्या तराफ्यांसोबत फोर्कलिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती. याठिकाणी -
बेलापूर विभागात 5 विसर्जन स्थळांवर 1195 घरगुती व 43 सार्वजनिक,
नेरुळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 858 घरगुती व 54 सार्वजनिक,
वाशी विभागात 2 विसर्जन स्थळांवर 565 घरगुती व 60 सार्वजनिक,
तुर्भे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 645 व 53 सार्वजनिक,
कोपरखैरणे विभागात 2 विसर्जन स्थळांवर 826 घरगुती व 94 सार्वजनिक,
घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 1329 घरगुती व 112 सार्वजनिक,
ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 631 घरगुती व 12 सार्वजनिक,
दिघा विभागात 1 विसर्जन स्थळांवर 538 घरगुती व 71 सार्वजनिक
- अशाप्रकारे 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 6587 घरगुती व 499 सार्वजनिक अशा 7086 श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन सुव्यवस्थित रितीने संपन्न झाले.
कृत्रिम तलावांना पसंती देत 1555 श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन करून नागरिकानी जपला पर्यावरणशील दृष्टीकोन
नैसर्गिक जलस्रोतांचे रक्षण करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी कृत्रिम तलावांचा वापर करावा असे आवाहन करीत 141 इतक्या मोठ्या संख्येने कृत्रिम विसर्जन तलवांची निर्मिती करण्यात आली होती. त्यासही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कृत्रिम तलावांमध्ये 1555 श्रीमूर्तींचे विसर्जन करीत नागरिकांनी पर्यावरणशीलतेचे दर्शन घडविले. यामध्ये -
बेलापूर विभागात – 19 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 148 घरगुती व 2 सार्वजनिक मंडळांच्या श्रीगणेशमूर्ती,
नेरूळ विभागात – 26 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 168 घरगुती व 5 सार्वजनिक मंडळांच्या श्रीगणेशमूर्ती,
वाशी विभागात – 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 60 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
तुर्भे विभागात – 17 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 53 घरगुती व 3 सार्वजनिक मंडळांच्या श्रीगणेशमूर्ती,
कोपरखैरणे विभागात – 15 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 94 घरगुती व 2 सार्वजनिक मंडळांच्या श्रीगणेशमूर्ती,
घणसोली विभागात - 21 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 149 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
ऐरोली विभागात – 18 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 218 घरगुती व 2 सार्वजनिक मंडळांच्या श्रीगणेशमूर्ती,
दिघा विभागात – 9 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 105 घरगुती व 6 श्रीगणेशमूर्ती
अशाप्रकारे एकूण 141 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 1535 घरगुती व 20 सार्वजनिक अशा एकूण 1555 श्रीगणेशमूर्तींचे भक्तीमय निरोप देत विसर्जन करण्यात आले.
शहरातील मुख्य 14 तलावांमध्ये गॅबियन वॉल पध्दतीच्या रचनेव्दारे निर्माण केलेल्या विशिष्ट जागेत भाविक भक्तांनी व मंडळांनी श्रीगणेशमुर्तीचे विसर्जन करून पर्यावरण जपणुकीच्या दृष्टीने महानगरपालिकेस अनमोल सहकार्य दिले.
नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी विसर्जन स्थळांना भेटी देत व्यवस्थेची केली प्रत्यक्ष पाहणी
नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी विसर्जन स्थळांना भेटी देत तेथील व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली व गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता श्री. संजय देसाई, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, घनकचरा व्यवस्थाप विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे संपूर्ण विसर्जन व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. सर्वच ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त श्री. मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा व वाहतुक पोलीस विभाग सक्षमतेने कार्यरत होता.
छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे श्रीमूर्तींवर मान्यवरांच्या हस्ते पुष्पवृष्टी
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्यतम व्यासपीठावरून विसर्जनस्थळाकडे प्रस्थान करणा-या श्रीगणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त श्री.राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता श्री. संजय देसाई, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, परिमंडळ 1 चे उप आयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता श्री. सुनिल लाड व श्री. अजय संख्ये, वाशी विभागाच्या सहा. आयुक्त श्रीम. मिताली संचेती, प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. पुरूषोत्तम जाधव, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव आणि इतर मान्यवरांनी श्रीगणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करीत अभिवादन केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियोजनबध्द व्यवस्थेत बाप्पाचा विसर्जनसोहळा निर्विघ्नपणे संपन्न
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 22 विसर्जन स्थळांवर श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जनाकरिता 40 मध्यम व 8 मोठ्या आकाराच्या तराफ्यांची तसेच मोठ्या आकाराच्या मुर्तींची अधिक संख्या लक्षात घेऊन 19 फोर्कलिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टीने काठांवर बांबूचे बॅरॅकेटींग तसेच पुरेशा विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली होती.
विसर्जनस्थळी येणा-या भाविकांच्या, विशेषत्वाने मुले व महिलांच्या सुरक्षेसाठी तसेच संभाव्य गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते हे लक्षात घेत 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर महानगरपालिकेमार्फत सी.सी.टि.व्ही. कॅमेरे लावण्यात आले होते. त्याव्दारे नवी मुंबई पोलीस विसर्जन व्यवस्थेवर बारकाईने नजर ठेवून होते. विसर्जन सोहळा सुरक्षित व निर्विघ्नपणे पार पाडण्यात सी.सी.टि.व्ही. कॅमे-यांची मोठ्या प्रमाणावर मदत झाली.
त्याचप्रमाणे भाविकांसाठी पिण्याचे पाणी आणि नागरी आरोग्य केंद्रामार्फत प्रथमोपचार साहित्यासह वैद्यकीय पथकांची उपलब्धता होती. 5 मुख्य विसर्जन स्थळांवर रूग्णवाहिकेसह आरोग्य पथके तैनात होती. विसर्जनासाठी आलेल्या श्रीगणेश मुर्तींची निरोपाची आरती व पूजन करण्याकरीता सर्व विसर्जन स्थळांवर टेबलची मांडणी करण्यात आलेली होती. श्रीमूर्तींच्या विसर्जनासाठी विसर्जनस्थळांवर 762 हून अधिक स्वयंसेवक, 390 लाईफ गार्ड्स यासह अग्निशमन जवान कृतीशीलतेने कार्यतत्पर होते.
गणेश विसर्जन सोहळ्यात जिंगलव्दारे नवी मुंबई शहर स्वच्छतेचा प्रचार
‘स्वच्छता ही सेवा’ या देशव्यापी उपक्रमांतर्गत रविवारी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वा. सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन 1 तास स्वच्छतेसाठी श्रमदान करावयाचे आहे. तशा प्रकारचे आवाहन मा. पंतप्रधान महोदय तसेच मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या वतीने करण्यात आले आहे. त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिकेने 267 ठिकाणी एकाच वेळी हे विशेष स्वच्छता अभियान 1 ऑक्टोबरला सकाळी 10 वा. राबविण्याची जय्यत तयारी केली असून त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन विसर्जन सोहळ्याप्रसंगी सातत्याने करण्यात येत होते. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील मोठ्या डिजीटल होर्डींगवरून याबाबतचे आवाहन प्रसिध्द करण्यात आले होते. या उपक्रमाची श्रीगणेशोत्सव विसर्जन सोहळ्यात व्यापक प्रसिध्दी करण्यात आली. याशिवाय सर्व विसर्जन स्थळांवर स्वच्छता ही सेवा उपक्रमाच्या स्टॅंडी ठेवण्यात आल्या होत्या. त्यालाही नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत आपले सेल्फी काढून सोशल माध्यमांवरून झळकविले.
स्वच्छ नवी मुंबई मिशनचे महानगरपालिकेचे ब्रॅंड ॲम्बेसेडर सुप्रसिध्द गायक, संगीतकार श्री. शंकर महादेवन यांनी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या घरातील श्रीमूर्ती विसर्जन स्थळाकडे घेऊन जाताना हात उंचावत चौकात उपस्थित नवी मुंबईकरांना अभिवादन केले.
अभिनव प्रयोगातून 7.85 टन निर्माल्य जमा
श्रीमुर्तींसोबत विसर्जनस्थळी येणा-या पुष्पमाळा, फुले, दुर्वा, तुळस, शमी, फळांच्या साली-तुकडे यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे ओले निर्माल्य तसेच मुर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान, प्लास्टिक, थर्माकोल असे सुके निर्माल्य ठेवण्यासाठी वेगवेगळ्या कलशांची व्यवस्था ठेवण्यात आली होती.
अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे या संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. अशाप्रकारे ओले व सुके निर्माल्य वेगवेगळ्या कलशात ठेवण्याच्या अभिनव संकल्पनेला गतवर्षीप्रमाणेच नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. अनंतचतुर्दशीदिनी 7 टन 850 किलो निर्माल्य संकलित झाले. निर्माल्याच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊन त्यावर तुर्भे प्रकल्पस्थळी प्रक्रिया केली जात आहे. याशिवाय श्रीमुर्तींसोबत आणली जाणारी फळे व खाद्य वस्तू तेथील स्वयंसेवकांमार्फत वेगळे ठेवण्यात येऊन निराधार व गरजूंना वितरीत करण्याची कार्यवाही करण्यात आली.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण पोलीस यंत्रणा दक्षतेने कार्यरत होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्रीगणेशविसर्जन पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी – कर्मचारी व स्वयंसेवक दक्षतेने कार्यरत होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकाप्रमाणेच महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून त्या त्या विसर्जनस्थळांवर व्यासपीठ उभारण्यात आले होते तसेच त्याठिकाणीही ध्वनीक्षेपकाव्दारे श्रीगणेशभक्तांचे स्वागत करण्यात येऊन त्यांना विसर्जनाच्या दृष्टीने मौलिक सूचना देण्यात येत होत्या तसेच 1 ऑक्टोबरच्या स्वच्छता ही सेवा उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत होते. संपूर्ण महापालिका क्षेत्रात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुनियोजित व्यवस्थापन करण्यात आल्याने विसर्जनसोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न झाला.
Published on : 29-09-2023 12:47:45,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update