‘माझी माती माझा देश’ उपक्रमांतर्गत एनएसडीच्या अमृत कलशात नवी मुंबईतील मातीचे संकलन
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे समारोपीय पर्वानिमित्त ‘माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम देशभरात अतिशय उत्साहात राबविला जात असून नवी मुंबई महानगरपालिका आपल्या स्तरावर विविध विभागांत लोकसहभागातून विविध उपक्रम राबवित आहे. नवी मुंबईकर नागरिकही यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत देशभक्तीचे दर्शन घडवित आहेत तसेच शहीद वीरांविषयी मनात असलेला आदर आणि अभिमान अभिव्यक्त करीत आहेत.
या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात ‘अमृत कलश यात्रा’ हा अभिनव उपक्रम राबविला जात असून यामध्ये नवी मुंबईच्या घराघरातून माती संकलित केली जात आहे. विभागांमध्ये निघणा-या या अमृत कलश यात्रांनाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांमार्फतही माझी माती, माझा देश उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रा काढून विविध ठिकाणची माती संकलित केली जात आहे.
अशाच प्रकारे नॅशनल सिक्युरिटी गार्ड मुंबई यांच्या वतीने मुंबई महानगर प्रदेशातील विविध महानगरपालिका कार्यालयांना भेटी देत त्याठिकाणची माती अमृत कलशात संकलित केली जात आहे.
या अनुषंगाने नुकतीच नॅशनल सिक्युरिटी गार्ड संस्थेच्या वतीने मेजर इंद्रजीत बर्वे व श्री. जसविंदर सिंग यांनी 26 सहका-यांच्या समुहासह नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट देत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या हस्ते नमुंमपा मुख्यालय आवारातील माती त्यांच्या अमृत कलशात संकलित करून घेतली. यावेळी शहर अभियंता श्री. संजय देसाई, माझी माती माझी देश अभियानाच्या नमुंमपा नोडल अधिकारी तथा उपआयुक्त श्रीम. मंगला माळवे, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता श्री. सुनिल लाड तसेच यात्रा समन्वयक स्माईल्स फाऊंडेशन संस्थेचे पदाधिकारी श्रीम. उमा आहुजा व धिरज आहुजा आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही अशाच प्रकारच्या अमृत कलश यात्रांचे विभागवार आयोजन केले जात असून ही विभागाविभागांतून संकलित केलेले मातीचे अमृत कलश नमुंमपा मुख्यालयात आणले जाणार आहेत व संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठीच्या मोठ्या अमृत कलशात एकत्रित केली जाणार आहे.
Published on : 02-10-2023 11:42:39,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update