शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अखेरची संधी
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध घटकांतर्गत राबविण्यात येणा-या विविध शिष्यवृत्ती योजनांकरिता सन 2021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर केलेले आहेत, अशा लाभार्थ्यांची योजनेच्या अटी / शर्तीनुसार पडताळणी करण्यात आलेली आहे व पात्रता निश्चित केलेल्या लाभार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आलेले आहे.
शिष्यवृत्ती योजनेकरिता ज्या लाभार्थ्यांनी योजनेच्या अटी-शर्तीनुसार परिपूर्ण अर्ज सादर केलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांना एसएमएस व्दारे कळविण्यात आलेले होते. परंतू ज्या लाभार्थ्यांनी सदर कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही अशा लाभार्थ्यांना पुन:श्च अंतिम सात दिवसांची मुदत देण्यात येत असल्याचे समाजविकास विभागाच्या माध्यमातून सूचित करण्यात आले आहे.
तरी ज्या लाभार्थ्यांनी शिष्यवृत्तीकरिता अर्ज सादर केलेले आहेत, परंतू अद्यापपर्यंत त्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही, त्यांनी ऑनलाईन पध्दतीने याबाबत पडताळणी करावी व नमूद केल्यानुसार कागदपत्राची पूर्तता करुन दि. 28 ऑक्टोबर 2023 पर्यंत पुन:श्च अर्ज सादर करावा असे आवाहन करण्यात येत आहे. या दिनांकापर्यंत प्राप्त होणा-या अर्जांची पडताळणी करुन लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल. तसेच जे लाभार्थी कागदपत्रांची पूर्तता विहीत मुदतीमध्ये करणार नाहीत अशा लाभार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरवून निकाली काढण्यात येतील याची कृपया नोंद घेण्यात यावी असे समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार यांच्यामार्फत स्पष्ट करण्यात आलेले आहे.
Published on : 20-10-2023 14:42:29,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update