विक्रमवीर सागरी जलतरणपटू ध्रुव मोहिते यांचा नवी मुंबई महानगरपालिकेत विशेष सत्कार
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उदयोन्मुख युवा क्रीडापटू, कलावंत आपल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे नवी मुंबईच्या नावलौकिकात लक्षणीय भर घालत असून त्यांचा यथोचित सन्मान करुन पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्याचे काम महानगरपालिका करीत आहे असे सांगत नमुंमपा आयुक्त् श्री. राजेश नार्वेकर यांनी श्री. ध्रुव अतुल मोहिते या युवकाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सागरी जलतरण क्रीडा प्रकारात केलेल्या विक्रमांबद्दल गौरव केला.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञान केद्रात संपन्न झालेल्या सागरी जलतरणपटू श्री ध्रुव मोहिते यांच्या विशेष सत्कारा प्रसंगी महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्यासह अतिरिक्त् आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, शहर अभियंता श्री. संजय देसाई, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त श्रीम. ललिता बाबर, शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री. दत्त्रात्रय घनवट, सहा.संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्क्र, अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील व श्री. शिरीष आरदवाड, क्रीडा अधिकारी श्रीम. अभिलाषा म्हात्रे व श्री. रेवप्पा गुरव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
20 वर्षीय सागरी जलतरणपटू श्री. ध्रुव मोहिते यांनी अरबी समुद्रातील 5 खाड्या पोहून पार केल्या असून त्यांच्या नावे जलदगती जलतरणपटू म्हणून एक वेळा आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, 4 वेळा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि 2 वेळा बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डमध्ये नोंदविले गेले आहे. अशा विक्रमांची नोंद असणारे ते मान्यताप्राप्त सागरी जलतरणपटू असून त्यांना विविध संस्थांमार्फत सन्मानित करण्यात आले आहे.
श्री. ध्रुव मोहिते यांनी एलिफंटा आयलॅंड ते गेटवे ऑफ इंडिया हे 12 कि.मी. चे सागरी अंतर 3 तास 7 मिनीटांमध्ये तसेच धरमतर पोर्ट ते रेवस जेट्टी हे 18 कि.मी. चे सागरी अंतर 3 तास 56 मिनीटांमध्ये पार केले आहे. त्याचप्रमाणे मोरा पोर्ट ते कासा खडक हे 14.14 कि.मी. चे सागरी अंतर 4 तास 40 मिनीटांमध्ये पार केले असून मोरा पोर्ट ते कारंजा जेट्टी हे 20 कि.मी. चे सागरी अंतर 5 तास 20 सेकंदामध्ये पार केले आहे. तसेच एलिफंटा आयलँड ते केगाव बीच उरण हे 12.12 कि.मी. चे सागरी अंतर 2 तास 56 मिनीटांमध्ये पोहून पार केले आहे. या सर्व विक्रमांची नोंद घेत नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते महापालिका मुख्यालयातील ज्ञान केंद्रात श्री. ध्रुव मोहिते यांचा विशेष सन्मान करीत त्यांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह प्रदान केले आहे.
Published on : 03-11-2023 11:39:00,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update