दिव्यांग मुले, व्यक्ती व त्यांचे पालक यांनी निर्मिलेल्या दिवाळी साहित्य प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियानाला दिव्यांग कल्याणाची जोड
नवी मुंबई महानगरपालिका इटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सुविधा केंद्राच्या माध्यमातून विविध प्रकारच्या दिव्यांगाच्या सक्षमीकरणासाठी काम करणारे देशातील सर्वोत्तम केंद्र म्हणून नावाजले जात आहे. दिव्यांग कल्याणकारी अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून इटीसी केंद्राने नेहमीच दिव्यांगाना आधार दिलेला आहे.
या अनुषंगाने इटीसी केंद्राच्या माध्यमातून आयकॉनिक इमारत म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीत आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग विद्यार्थी, व्यक्ती व त्यांचे पालक यांनी बनविलेल्या विविध दिवाळी साहित्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ मार्फत दिवाळी उत्सवाच्या कालावधीत ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ मोहीम राबविण्याचे सूचित करण्यात आले असून महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने इतर विभागांच्या सहयोगातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
यामध्ये दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देणारा तसेच ‘थ्री आर’ च्या अनुषंगाने टाकाऊपासून टिकाऊ वस्तू निर्मितीला प्राधान्य देणारा हा दिव्यांगामार्फत दिवे, आकाशकंदील व इतर दिवाळी साहित्य निर्मितीचा अभिनव उपक्रम अत्यंत आगळावेगळा आहे.
या वस्तूंच्या महापालिका मुख्यालयातील प्रदर्शनास आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी भेट देत या दिव्यांग मुलांचे, व्यक्तींचे तसेच त्यांच्या पालकांचे उत्तम कलाकृती निर्मितीबद्दल कौतुक केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता श्री. संजय देसाई, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, ईटीसी केंद्र संचालक उपआयुक्त श्रीम. ललिता बाबर आणि इतर विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
या दोन दिवसीय दिव्यांग व त्यांच्या पालकांनी निर्माण केलेल्या दिवाळी वस्तू प्रदर्शनाला नमुंमपा अधिकारी, कर्मचारी व महापालिका मुख्यालयात येणा-या अभ्यागतांनी भेट देऊन वस्तू खरेदी करून त्यांचा उत्साह वाढविला. ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘थ्री आर’च्या अनुषंगाने ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ मोहीमेतही एका चांगल्या दिव्यांग कल्याणकारी उपक्रमाची नोंद झाली.
Published on : 06-11-2023 12:53:09,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update