नमुंमपा कर्मचा-यांसाठी यशदामार्फत माहितीचा अधिकार विषयक एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
कोणत्याही कायद्यामधील अद्ययावत माहिती घेणे कामकाजातील सूसुत्रीकरणासाठी महत्वाचे असून त्यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदासाठी आयोजित करण्यात आलेल्या माहितीचा अधिकार विषयक विशेष प्रशिक्षण वर्गातील ज्ञानाचा लाभ करुन घ्यावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी केले.
नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन विभागामार्फत यशदा या नामांकित संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 विषयक प्रशिक्षण वर्गाच्या शुभारंभप्रसंगी त्या आपले मनोगत व्यक्त करीत होत्या. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार यांनी नागरिकांना असलेल्या माहितीच्या अधिकाराविषयी भाष्य करीत यामुळे शासकीय कारभारात अधिक पारदर्शकता आलेली आहे असे सांगत कार्यालयीन कामकाजातील माहितीचा अधिकार अधिनियमाचे महत्व विशद केले.
यशदा अर्थात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यांच्या माहिती अधिकार केंद्राच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये माहितीचा अधिकार विषयक कामकाज हाताळणा-या सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारीवृंदासाठी विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये यशदाच्या मुख्य प्रशिक्षक श्रीम. रेखा साळुंखे तसेच संशोधन अधिकारी तथा सत्र संचालक श्री. दादु बुळे यांनी दैनंदिन कामकाजातील अनेक उदाहरणे देत माहितीचा अधिकार अधिनियम सोपा करुन सांगितला.
माहितीचा अधिकार अधिनियमातील कलमांविषयी विस्तृत माहिती देत त्यामधील अनेक बारकावे त्यांनी उलगडून दाखविले. माहितीचा अधिकार अधिनियमाचा कार्यप्रणालीत पारदर्शकता व खुलेपणा निर्माण करणे हा उद्देश असून त्यादृष्टीने कामकाज करणे अपेक्षित असल्याचे या दोन्ही प्रशिक्षकांनी आपल्या व्याख्यान सत्रात स्पष्ट केले.
प्रशासन विभागाच्या वतीने दोन सत्रात आयोजित करण्यात आलेल्या माहितीचा अधिकार अधिनियम 2005 विषयावर आयोजित प्रशिक्षण वर्गात पहिल्या सत्रामध्ये महापालिका मुख्यालयात असलेल्या विविध विभागांतील माहितीचा अधिकार संबधित प्रथम अपिलीय अधिकारी, जन माहिती अधिकारी, सहा.जन माहिती अधिकारी यांनी तसेच दुस-या सत्रात मुख्यालयाबाहेर असलेल्या महानगरपालिकेच्या इतर विभागांच्या व विभाग कार्यालयांच्या माहितीचा अधिकार संबधीत अधिका-यांनी प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेतला.
Published on : 09-11-2023 09:07:31,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update