वायू प्रदूषण रोखण्यासाठी आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचा विकासक व वास्तुविशारदांशी संवाद
नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता चांगली रहावी ही सर्व नागरिकांची जबाबदारी असून प्रदूषण कमी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना राबवित आहे. वायू प्रदुषणामध्ये बांधकामे करताना उडणारी धूळ हा एक महत्वाचा विषय असून यादृष्टीने बांधकामाशी संबधित घटकांना सतर्क करण्यासाठी महापालिका मुख्यालयात बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारद यांच्या विशेष बैठकीचे महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी संवाद साधताना आयुक्तांनी मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने हवा गुणवत्तेबाबत तत्पर कार्यवाही करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती दिली व यामध्ये बांधकामांमुळे होणा-या प्रदूषणाला प्रतिबंध करण्यासाठी महानगरपालिकेने त्वरित केलेल्या कार्यवाहीविषयी सांगितले.
महापालिका प्रशासन व बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारद यांनी एकत्र येऊन शहराचा विकास करताना शहराच्या हवा गुणवत्ता प्रमाणकाचीही काळजी घ्यावी असे आयुक्तांनी सांगितले. मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बांधकाम साईट्सवरुन पुढील आदेश होईपर्यंत डेब्रिजची अजिबात वाहतूक होणार नाही याचे काटेकोर पालन करावे असे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे साईट्सवर बांधकाम साहित्य आणणे अत्यंत गरजेचे असेल तेव्हा ते वाहन पूर्णत: झाकलेले असेल असेही स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले.
नवी मुंबई महानगरपालिकेने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा हवा गुणवत्ता नियंत्रण आराखडा अंगीकृत केला असल्याची माहिती देत आयुक्तांनी त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी व वास्तुविशारदांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन केले.
नवी मुंबई महानगरपालिका केवळ खाजगी बांधकाम व्यावसायिकांना वायू प्रदूषण रोखण्याबाबत निर्देश देत नाही तर सोबत महानगरपालिकेमार्फत सुरु असणा-या विविध प्रकारच्या बांधकामांच्या ठिकाणीही वायू प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेत असल्याचे व तशा प्रकारचे निर्देश अभियांत्रिकी विभागाला दिले असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
यावेळी वास्तुविशारद श्री. संतोष सतपथी यांनी बांधकामांमुळे होणारे वायू प्रदूषण व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली. याप्रसंगी शहर अभियंता श्री. संजय देसाई, सहा.संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबईचे अध्यक्ष श्री. वसंत बद्रा, असोसिएशन ऑफ आर्किटेक्टचे अध्यक्ष श्री. शेखर बागुल तसेच बांधकाम व्यावसायिक सर्वश्री हितेन जैन, केतन त्रिवेदी, अनिल पटेल व लखाणी त्याचप्रमाणे वास्तुविशारद श्री. कौशल जाडिया आणि इतर बांधकाम व्यावसायिक व वास्तुविशारद मोठया संख्येने उपस्थित होत.
बांधकामाच्या ठिकाणी धूळ निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे, त्यासाठी स्प्रिंकलर फवारणी करणे याबाबींची काटेकोर दक्षता घ्यावी व नवी मुंबईकरांची दिवाळी स्वच्छ, प्रदूषणमुक्त व सुरक्षित करण्यासाठी सर्वांनी कटिबध्द होऊया असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी बांधकाम व्यावसायिक व वास्तुविशारद यांना केले.
Published on : 09-11-2023 15:10:40,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update