नवी मुंबई मनपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे प्रसारमाध्यम प्रतिनिधींसमवेत दिवाळी स्नेह संमेलन
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणा-या लोकोपयोगी कामांची, प्रकल्पांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम प्रसार माध्यमांमार्फत होत असून नागरिकांच्याही अडी-अडचणी, मागण्या यादेखील प्रशासनापर्यंत प्रसार माध्यमांमार्फत पोहचत असतात. प्रसारमाध्यमे ही नागरिक आणि महापालिका यांच्यामधील अत्यंत महत्वाचा दुवा असून देशातील सर्वात मोठ्या प्रमाणात साज-या होणा-या दिवाळी सणाच्या निमित्ताने माध्यम प्रतिनिधींशी संवाद व्हावा आणि विचारांचे, शुभेच्छांचे आदान-प्रदान व्हावे याकरिता दिवाळी स्नेहसंमेलनासारखा उपक्रम राबविण्याचे ठरविले आणि त्याला इतक्या मोठ्या प्रमाणात उत्साही प्रतिसाद देऊन हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल माध्यम प्रतिनिधींचे स्वागत करीत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या संकल्पनेतून प्रसारमाध्यम प्रतिनिधींसमवेत दिवाळी स्नेहसंमेलनाचे आयोजन महापालिका मुख्यालयात करण्यात आले होते. यावेळी विविध वृत्तपत्रे व वृत्तचित्रवाहिन्यांचे प्रतिनिधी, कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयुक्त महोदयांसमवेत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता श्री. संजय देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे, मुख्य लेखा परीक्षक श्री. जितेंद्र इंगळे, उपआयुक्त श्रीम. मंगला माळवे, श्रीम. ललिता बाबर, श्री. दत्तात्रय घनवट, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या वतीने मनोगत व्यक्त करताना श्री.प्रवीण पुरो व श्री.शेखर हम्प्रस यांनी आयुक्तांमार्फत प्रसारमाध्यम प्रतिनिधींसमवेत दिवाळी फराळासह स्नेहसंमेलनाचे आयोजन ही संकल्पनाच सकारात्मक भावना निर्माण करणारी असल्याचे सांगितले. अशाप्रकारे आयुक्तांनी पुढाकार घेऊन प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवादी असणे यामधून माणसे जोडण्याचा त्यांच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते असेही ते म्हणाले. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे अभिप्राय देत सर्व पत्रकार बंधू-भगिनींच्या वतीनेही आयुक्त श्री. राजेश नार्वेकर आणि महापालिका प्रशासनास दिवाळी शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.
Published on : 10-11-2023 11:57:23,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update