नमुंमपामार्फत ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियानांतर्गत किल्ले स्पर्धा आयोजन
केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत या दिवाळी उत्सवामध्ये ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ हे अभियान जाहीर करण्यात आले असून या अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त
श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात आले. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकामार्फत ‘स्वच्छ भारत अभियान 2.0’ अंतर्गत ‘किल्ले स्पर्धा’ जाहीर करण्यात आलेली आहे.
भारतात सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक उत्साहात साजरा केल्या जाणारा दिवाळी उत्सव हा रोषणाई, उल्हास, प्रेम, मैत्री आणि मानवता या भावनांनी भारलेला उत्सव आहे. शौर्य आणि पराक्रम यांचा वारसा जपणा-या महाराष्ट्रात दिवाळी सणाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणावर किल्ले बनविण्यात येतात. यामध्ये लहान मुले असोत की तरूण हे सर्व एकत्र येऊन किल्ले बांधतात.
त्यामुळे या प्रतिकात्मक किल्ले बांधणा-या मुलांना आणि युवकांना प्रोत्साहन मिळावे आणि यामधून संस्कृती संवर्धन व्हावे यादृष्टीने स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिके मार्फत किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
या किल्ले स्पर्धेमध्ये मुले, युवक, नागरिक त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांसोबत सेल्फी काढावा तसेच http:/rb.gy/11ynws या लिंकवर शपथ घेऊन अभियानात सहभागी झाल्याचे प्रशस्तिपत्र डाऊनलोड करून घ्यावे व त्यानंतर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करावे. पोस्ट करताना @nmmconline आणि @sbmurbangov या ऑफिशियल अकाऊंटला टॅग करावे. ज्या पोस्टला सर्वाधिक लाईक्स मिळतील त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रशस्तिपत्र आणि आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत.
तरी लहानमोठ्या नवी मुंबईकर नागरिकांनी किल्ले स्पर्धेमध्ये उत्साहाने सहभागी होऊन स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभियानात योगदान द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 10-11-2023 13:02:12,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update