वेतन बँक खाती एकाच बँकेत केल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक कामकाजात सुनियोजितपणा तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी यांनाही विविध सुविधांचा लाभ
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दर्जेदार सेवासुविधा पुरविण्यासोबतच आर्थिक ताळेबंदही सुस्थितीत राखण्याकडे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे बारकाईने लक्ष आहे. त्यासोबतच सेवासुविधा पूर्ततेसाठी मनापासून काम करणाऱ्या महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रशासकीय बाबींकडेही विशेष लक्ष दिले जात आहे.
या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन एकाच बँकेतून व्हावे व या माध्यमातून कामकाजात सुनियोजीतपणा यावा यादृष्टीने महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या वेतनाचे बँक खाते आयडीबीआय बँकेमध्ये सुरु करण्यास नुकतीच महापालिका आयुक्त यांनी मंजूरी दिली असून तशा प्रकारचा सामंजस्य करार (Memorandum of understanding) नवी मुंबई महानगरपालिका आणि आयडीबीआय बँक व्यवस्थापन यांच्यामध्ये करण्यात आला. याव्दारे नमुंमपा अधिकारी, कर्मचारीवृंदाला कोणतीही अतिरिक्त प्रिमियम रक्कम न भरता मोठ्या स्वरूपाचे लाभ मोफत उपलब्ध करून देणारी नवी मुंबई ही पहिलीच महानगरपालिका आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर तसेच आयडीबीआय बँकेच्या वतीने मुख्य महाव्यवस्थापक श्री. शशांक दिक्षीत यांनी सांमजस्य करारावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे तसेच प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री. शरद पवार, शहर अभियंता श्री. संजय देसाई, वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, लेखाधिकारी श्री. दयानंद कोळी आणि आयडीबीआय बँकेचे अधिकारी महाव्यवस्थापक तथा नवी मुंबईचे वरिष्ठ क्षेत्रप्रमुख श्री. टोनी सॅबस्टिन, उप महाव्यवस्थापक तथा वाशी शाखाप्रमुख श्री. संजय कुमार उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात असलेल्या कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी यांची बँक खाती एका बँकेत व मुख्यालयाबाहेर असलेल्या कार्यालयांतील बँक खाती वेगवेगळया बँकांमध्ये होती. सदर बँक खाती एकाच बँकेत असतील तर महानगरपालिकेस एक संस्था म्हणून आर्थिक व्यवहार करणे सोयीचे होईल व विविध सुविधांच्या स्वरुपात महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनाही अधिकचा काही लाभ मिळू शकेल याबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे यांनी संकल्पना मांडली होती.
त्यास अनुसरुन विविध बँकांशी संपर्क साधण्यात आला व त्यांना या अनुषंगाने प्रस्ताव सादर करणेविषयी आवाहन करण्यात आले. यामध्ये प्राप्त 12 बँकांच्या प्रस्तावांचा अभ्यास करुन त्यामधील चार बँकांना अंतिम सादरीकरण करण्यास पाचारण करण्यात आले. याबाबतचे सादरीकरण मा. आयुक्त यांच्या समक्ष होऊन त्यामधील सर्व अटी आणि शर्ती पूर्ण करणाऱ्या तसेच नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांना सर्वाधिक लाभ देणाऱ्या आयडीबीआय बँकेच्या प्रस्तावास संमती देण्यात आली. त्यास अनुसरुन बँकेसोबत सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.
यापुढील एक ते दीड महिन्याच्या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच तात्पुरत्या स्वरुपात ठोक मानधनावर कार्यरत कर्मचारी यांचीही बँकखाती उघडण्यासाठी आवश्यक माहिती संकलित केली जाणार असून प्रत्येकाचे व्यक्तिगत सेव्हिंग खाते आयडीबीआय बँकेत सुरु करण्यात येणार आहे.
हे खाते उघडल्यानंतर नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांना विविध सुविधांचे लाभ बँकेमार्फत देण्यात येणार आहेत. यामध्ये रु. 2 लक्ष रकमेचा कॅशलेस ग्रुप इन्शुरन्स दिला जाणार असून दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाल्यास वैयक्तिक अपघात विमा 1 कोटी रक्कमेपर्यंत ऑन डयुटी / ऑफ डयुटी लागू असणार आहे. इतक्या मोठ्या स्वरूपाचा लाभ कर्मचा-यांकडून कोणताही अतिरिक्त प्रिमीयम भरुन न घेता मोफत उपलब्ध करुन देणारी नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका आहे.
याशिवाय रूग्णालयातील प्रतिदिन रूम भाडे 2 टक्के म्हणजेच रू. 4 हजार व आयसीयू करिता रू. 8 हजार इतक्या मर्यादेत असणार आहे.विशेष म्हणजे अधिकारी, कर्मचारी यांच्या सध्या असलेल्या आजारांकरिता प्रतिक्षा कालावधी नसेल. वेतनाची रक्कम जमा झाल्यानंतर 30 दिवसांनी लाभ देता येईल. र लक्ष विमा रक्कम पूर्ण होईपर्यंत अधिकारी, कर्मचारी आवश्यकतेनुसार कितीही वेळा रूग्णालयात दाखल होऊ शकतात. सर्वसाधारण प्रसूतीसाठी रू. 50 हजार व सिझेरियन प्रसूतीसाठी रू. 75 हजार विमा कव्हर असणार आहे. रूग्णालयात दाखल करण्याकरिता रूग्णवाहिका खर्च रू. 1 हजारपर्यंत ग्राह्य धरण्यात आलेला आहे. तसेच रूग्णालयात दाखल होण्यापूर्वी 60 दिवसांपर्यंतचा आणि रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 120 दिवसांपर्यंतचा वैद्यकीय खर्च अनुज्ञेय असणार आहे.
यासोबतच मृत कर्मचाऱ्याच्या मुलांना 5 लक्ष रक्कमेपर्यंतचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. अपघातात कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास अपंगत्वाच्या प्रमाणनुसार जास्तीत जास्त 1 कोटीपर्यंत विमा रक्कम तसेच कायमस्वरुपी अंशिक अंपगत्व आल्यास अपंगत्वाच्या प्रमाणानुसार जास्तीत जास्त 50 लाखापर्यंत विमा रक्कम प्राप्त होणार आहे. याशिवाय विमान अपघातात मृत्यू झाल्यास 1 कोटीपर्यंत अपघात विमा रक्कम दिली जाणार आहे.
याखेरीज एटीएम मधून पैसे काढण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. एटीएम मधून एका दिवसात 1 लक्षपर्यंत रोख रक्कम काढता येईल. प्लॅटिनम कार्डवर तीन महिन्यात दोनदा संपूर्ण भारतामध्ये तसेच सिग्नेचर डेबिट कार्डवर तीन महिन्यात चार वेळा एअरपोर्ट लाँज एक्सेस सुविधा उपलब्ध असेल. एटीएम कार्ड हरवल्यास त्याची जबाबदारी घेत रु.20 हजार पर्यंतच्या रकमेचे खरेदी संरक्षण दिले जाणार आहे. डेबिट कार्डवर रु. 400 ते 4000 रक्कमेपर्यंचा पेट्रोल अधिभार माफ केला जाणार आहे. विमा संरक्षणात रु. 50 हजार रक्कमेपर्यंत घराची अग्निसुरक्षा व घरफोडी संरक्षण रक्कम समाविष्ट आहे. यासोबत पासपोर्ट, ट्रॅव्हल बॅग अशा प्रकारचे साहित्य हरविल्यास रू. 50 हजार पर्यंतची अधिकची विमा रक्कम दिली जाणार आहे.
महत्वाचे म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारीवृंदास विविध सुविधांच्या स्वरुपात व विम्याच्या स्वरुपात याचा प्रत्यक्ष लाभ कोणताही अतिरिक्त रक्कम भरावी न लागता मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची वेतन बॅंक खाती एकाच बँकेत आल्याने लेखा विभागास आर्थिक नियोजन करण्यासाठी सोयीची अशी ही नवीन प्रणाली सर्वच दृष्टीने लाभदायी ठरणार आहे.
Published on : 28-11-2023 11:28:16,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update