साडेचार हजारहून अधिक नागरिकांनी स्वच्छतेचा संदेश देत यशस्वी केली स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या स्वच्छताविषयक कार्याला सहकार्य करण्याच्या व प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेतून लेट्स सेलिब्रेट फिटनेस या संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन मध्ये साडेचार हजारहून अधिक नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत ही मॅरेथॉन यशस्वी केली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीम सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, क्रीडा विभागाच्या उपायुक्त श्रीम. ललिता बाबर, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव व श्रीम. अभिलाषा म्हात्रे यांनी याप्रसंगी उपस्थित राहून सहभागी धावपटूंना प्रोत्साहित केले.
नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छताकर्मी ज्या समर्पित भावनेने शहर स्वच्छतेसाठी अहोरात्र काम करतात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत महानगरपालिकेच्या स्वच्छता कार्याला सहकार्य म्हणून नवी मुंबईकर नागरिकांमध्ये कचऱ्याचे 3 प्रकारे वर्गीकरण करणे व कचऱ्याची विल्हेवाट याबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच 'निश्चय केला, नंबर पहिला' हे महानगरपालिकेचे ध्येय साध्य करण्यासाठी या स्वच्छ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आल्याचे लेट्स सेलिब्रेट फिटनेस च्या संयोजक श्रीम. रिचा समित यांनी सांगितले.
सकाळी 5.30 वा. सुरू झालेल्या या 'स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन' मध्ये 5 किलोमीटरच्या मॅरेथॉनमधून अपोलो रुग्णालयाच्या कॅन्सर सेंटरने अंत थॅलेसेमियाचा या घोषवाक्यास अनुसरुन जनजागृती केली. आयडीबीआय बँकेने दहा किलोमीटर आणि 21 किलोमीटर स्वच्छता रन आयोजनात सहकार्य केले.
विशेष म्हणजे या मॅरेथॉनमध्ये 200 हून अधिक तृतीयपंथी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याशिवाय अडीचशेहून अधिक दिव्यांग व्यक्तींनी तसेच महाराष्ट्र राज्यस्तरीय अंध दिव्यांगांच्या कल्याणकारी संस्था सदस्यांनीही यामध्ये सहभागी होत आपली सामाजिक बांधिलकी प्रदर्शित केली. रोटरी क्लब नवी मुंबईचेही या आयोजनात सहकार्य लाभले.
स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉनच्या 21 किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉनमध्ये वय वर्ष 18 ते 29 पुरुष गटात उदयसिंग पडवी आणि महिला गटात आरती देशमुख यांनी विजेतेपद पटकावले. 30 ते 39 वर्ष पुरुष गटात शशी दिवाकर व महिला गटात सोनिया प्रामाणिक यांनी तसेच 40 ते 49 वर्ष पुरुष गटात शिवानंद शेट्टी आणि महिला गटात वरुणा राव यांनी त्याचप्रमाणे साठ वर्षावरील पुरुष गटात भूपेंद्र हरदेव तसेच 50 ते 59 महिला गटात गीतांजली लेंका यांनी विजेतेपद पटकावले. प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांकांना पारितोषिके देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. 21 किलोमीटर प्रमाणे 10 किलोमीटर व 5 किलोमीटर अंतराच्या पुरुष व महिला गटातील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजन सहकार्य करणाऱ्या संस्थांचा लेट्स सेलिब्रेट फिटनेसच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्तेही पारितोषिके वितरित करण्यात आली.
अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता कार्याला सहकार्य करण्याची भूमिका घेऊन लेट्स सेलिब्रेट फिटनेस संस्थेने स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन सारखा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
Published on : 01-12-2023 12:50:07,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update