नमुंमपाच्या आरोग्य विभागामार्फत डासअळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण मोहीम
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात डास प्रादुर्भाव नियंत्रण ठेवणेकरिता नियोजित साप्ताहिक वेळापत्रकानुसार डासअळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जातो, याकरिता नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पूर्ण कार्यक्षेत्राचा विचार करुन साप्ताहिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येते, जेणेकरुन प्रत्येक कार्यक्षेत्रात आठवड्यातून एकदा फवारणी व धुरीकरण करता येईल.
तथापि नवी मुंबई महागनरपालिका कार्यक्षेत्राची भौगोलिक रचना लक्षात घेता नागरी वस्तीलगत असणारा खाडी किनारा व त्यालगत असणारा दलदलीचा परिसर यामध्ये हिवाळा कालावधीमध्ये डासांची घनता वाढण्याच्या दृष्टीने पोषक वातावरण असल्याने या कालावधीत इतर कालावधीपेक्षा जास्त डास प्रादुर्भाव जाणवतो. परिणामी सदर कार्याक्षेत्रालगतच्या नागरी वस्तीमधून डासप्रादुर्भावाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असतात.
यामुळे नागरिकांना डासांचा त्रास जाणवू नये या उद्देशाने महापालिका आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डासप्रादुर्भाव कमी करण्यासाठी दि.1 नोव्हेंबर 2023 ते 24 फेब्रुवारी 2024 या कालावधीत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
यामध्ये सायंकालीन डास घनता सर्वेक्षण करण्यात येणार असून या अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर प्रत्येक गुरुवारी आरोग्य सहाय्यक यांच्या पर्यवेक्षणाखाली सायंकालीन डास घनता निरीक्षण करण्यात येणार आहे.
याचप्रमाणे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सकाळच्या धुरीकरणासोबत नियमितपणे नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत या कालावधीत करीता सायंकालीन धुरीकरण कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे.
सदर कार्यवाहीसोबत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रराचे वैद्यकीय अधिकारी यांच्या अधिपत्याखालील आरोग्य सहाय्यकांमार्फत पर्यवेक्षण करुन सायं. 5:30 त 6:00 वा. सुरु करण्यात येते व त्या दिवसाचे नियोजित फिलींग पूर्ण होईपर्यंत करण्यात येते.
सकाळचे धुरीकरण हे साप्ताहिक वेळापत्रकानुसार नियोजित कार्यक्षेत्रामधील बंद गटारांमध्ये केले जाते तसेच सायंकालीन धुरीकरण गावठाण, झोपडपट्टी व सोसायटी अंतर्गत मीटर रुम, जीने याठिकणी पंधरवडा कार्यक्रमानुसार राबविले जाते.
दि.1 नोव्हेंबर 2023 ते 24 फेब्रुवारी 2024 या कालावधीत सायंकालीन धुरीकरण करण्यास आठवड्याकरिता 464 अतिरिक्त धुरीकरण फिलींगनुसार नियोजन करण्यात आले असून सदरच्या फिलींग्सचा वापर सायंकालीन धुरीकरणाच्या पंधरवडा वेळापत्रकानुसार केला जाणार आहे.
तरी नागरिकांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नमुंमपाच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे व धुरीकरणाविषयी काही तक्रारी असल्यास नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 06-12-2023 13:52:16,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update