नागरिकांना अपेक्षित अशा गतीमान सेवापूर्तीसाठी कार्यतत्पर राहण्याचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे निर्देश
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागांमध्ये परस्पर समन्वय राहावा व नागरिकांना महानगरपालिकेशी संबंधित सेवा विहित कालावधीत, कमीत कमी श्रमात सहजपणे उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने नवीन इआरपी (इंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) प्रणाली कार्यान्वित करण्याची कार्यवाही जलद पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांनी अधिक काटेकोर लक्ष द्यावे असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी दिले. विविध विभागांतील कामांचा आढावा घेताना त्यांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीत इआरपी प्रणालीच्या सदयस्थितीचा सविस्तर आढावा घेतला व विभागांचा प्राधान्यक्रम ठरवून काम पूर्ण होईल तसतशा त्या त्या विभागांच्या सेवा कार्यान्वित कराव्यात असे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते.
या बैठकीप्रसंगी इआरपी प्रणालीत उपलब्ध सुविधांची आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी बारकाईने पाहणी केली व काही सेवा उपलब्धतेची कार्यवाही जाणून घेतली. सध्याची कार्यान्वित इआरपी प्रणाली अदययावत केली जात असून यामुळे मुख्यालय व विभाग कार्यालयांसह इतर विभाग यांच्याकरीता एकच सॉफ्टवेअर वापरले जाईल आणि सर्व विभागांच्या कामकाजात एकसूत्रता येईल. महापालिका प्रशासन आणि नागरिक या दोघांच्या दृष्टीने इआरपीची ही नवी प्रणाली लाभदायक असून नवी मुंबई महानगरपालिकेने डिजीटायलेझेशनच्या दिशेने टाकलेले हे पुढचे पाऊल आहे.
या सोबतच लिडार सर्वेक्षणाचा आढावा घेताना आयुक्तांनी मालमत्ताकर विभागाने सर्वेक्षणाव्दारे उपलब्ध माहितीच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही तत्परतेने सुरु करावी असे निर्देशित केले. स्वच्छता ही नवी मुंबईची ओळख असून यामध्ये अधिकाधिक सुधारणा करत राहणे हे आपले उद्दीष्ट आहे. स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियान या अनुषंगाने विभागनिहाय नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांपासून प्रत्येक घटकाने आपापली कामे सतर्कतेने करावयाची असून शहराचे मानांकन उंचाविण्यासाठी सर्वोतोपरी योगदान द्यावयाचे आहे. यामध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही व जबाबदारी निश्चित केली जाईल असा स्पष्ट इशारा आयुक्तांनी दिला.
‘उदयानांचे शहर’ ही देखील नवी मुंबईची एक वेगळी ओळख असून उदयानांची स्थिती सुधारण्यावर भर द्यावा तसेच खेळणी दुरूस्तीसोबतच टॉय ट्रेन सुरू करण्याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले. उदयानांच्या अधिक चांगल्या विकासासाठी आवश्यक बाबींची उद्याननिहाय विभागवार सूची करण्याचे निर्देश आयुक्तांनी यापूर्वीच दिले होते त्या अनुषंगाने विशेष आढावा बैठक घेण्यात येईल हे देखील आयुक्तांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ नागरिक काळजी केंद्र वापराचे धोरण लवकरात लवकर अंतिम करावे तसेच से-15 बेलापूर पार्कींग इमारत, ज्येष्ठ नागरिक काळजी केंद्र सीवूड्स, से-9 वाशी बसडेपो, वाशी अग्निशमन केंद्र, स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन, पशुवैदयकिय रुग्णालय येथील सुविधा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने गतीमान कार्यवाही करावी असेही निर्देश आयुक्तांनी आढावा घेताना दिले.
घणसोली सेंट्रल पार्क येथील तरण तलावाचे काम जलद गतीने पूर्ण करावे तसेच ठिकठिकाणच्या मार्केट गाळयांचे वितरणही नोंदणीकृत फेरीवाल्यांना सूचना देऊन लॉटरी पध्दतीने कालबध्द नियोजन करुन जलद पूर्ण करावे असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
समाजविकास विभागामार्फत सुरू असलेल्या शिष्यवृत्ती योजनांतर्गत या वर्षातील विदयार्थ्यांची शिष्यवृत्ती योजना कार्यवाही सुरु करण्यात यावी व शिष्यवृत्तीसाठी विदयार्थी नोंदणीच्या कार्यवाहीतरिता थेट शाळांची मदत घेण्याबाबत तपासणी करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले.
बांधकाम पूर्ण झालेल्या नविन शाळा इमारती कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी तसेच शाळा इमारतींमधील दुरुस्तीची कामेही गरजेच्या ठिकाणी शिक्षण व अभियांत्रिकी विभागाने परस्पर समन्वयाने पूर्ण करुन घ्यावीत असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
‘विकसीत भारत – संकल्प यात्रे’चे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठीचे वेळापत्रक येणार असल्याचे गृहीत धरुन नमुंमपा क्षेत्रातील विभागनिहाय जागा निवडून ठेवाव्यात असे निर्देश आयुक्तांनी दिले. नागरिकांना अपेक्षित गतीमान व दर्जेदार सेवासुविधापूर्तीकरिता काम करणे अपेक्षित असून त्यादृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांचे सहकार्य घेऊन नियोजनबध्द काम करण्याचे निर्देश आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी दिले.
Published on : 11-12-2023 13:40:40,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update