विकसित भारत संकल्प यात्रेची नवी मुंबई मध्ये सुरुवात
केंद्र शासनाच्या अनेक फ्लॅगशीप योजनांपासून अजूनही काही लाभार्थी वंचित आहेत. या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी संपूर्ण देशभर विकसित भारत संकल्प यात्रेचा उपक्रम राबविला जात आहे.
त्यानुसार समाजातील सर्वसामान्य घटकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. त्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पंतप्रधान ना.श्री. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'विकसित भारत संकल्प यात्रा' हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने काटेकोरपणे केली असून दि.२६ डिसेंबर २०२३ पासून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात आठही विभाग कार्यालय परिसरामध्ये ठिकठिकाणी यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या योजनांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या पीएम स्वनिधी योजना, स्वनिधी से समृद्धी योजना, आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड योजना, उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा, पीएम मुद्रा लोन, स्वच्छ भारत अभियान, स्टार्ट अप इंडिया, खेलो इंडिया, पीएमई बस सेवा, आरोग्य तपासणी शिबीर अशा विविध योजनांची माहिती वंचित लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्यात येणार आहे.
नवी मुंबईमध्ये ह्या योजनांची माहिती प्रदर्शित करणारा विकसित भारत संकल्प यात्रेचा जनजागृती रथ महानगरपालिकेच्या ८ विभाग कार्यालय क्षेत्रात फिरून योजनांची अंमलबजावणी करण्यात पुढाकार घेणार आहे. आपल्या विभागात आपल्या घरापर्यंत येणाऱ्या या विकसित भारत संकल्प यात्रेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नागरिकांना केलेले आहे.
Published on : 05-01-2024 08:02:37,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update