*डी मार्ट सानपाडा यांच्याकडून एकरकमी 1 कोटी 60 लक्ष मालमत्ताकर भरणा केल्याने अटकावणीची कारवाई मागे*
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ताकर विभागामार्फत प्रभावी करवसूलीकडे विशेष लक्ष दिले जात असून थकबाकीदारांना आवाहन करून, नोटीस बजावूनही प्रतिसाद न देणा-या थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. अशाच प्रकारची करवसूली कारवाई आज सानपाडा येथील डी मार्टवर करण्यात आली. त्या अनुषंगाने डी मार्ट आस्थापनेने 1 कोटी 60 लक्ष 75 हजार 449 रक्कमेचा त्वरित ऑनलाईन भरणा केल्याने अटकावणीची कारवाई मागे घेण्यात आली.
सानपाडा सेक्टर 10 येथील भूखंड क्र.187 वर असलेले मे. अँव्हेन्यू सुपर मार्ट प्रा. लिमी. अर्थात प्रचलित डी मार्ट यांच्या मालमत्तेची मालमत्ताकरापोटी रू.1,60,75,449/- मात्र रक्कमेची थकबाकी असल्याने त्यांना थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी यापूर्वीच सात दिवसांची नोटीस देण्यात आलेली होती.
परंतू संबंधितांकडून मालमत्ताकर भरणा करण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने 04 जानेवारी रोजी अतिरिक्त आयुक्त तथा मालमत्ताकर विभागाच्या प्रमुख श्रीम. सुजाता ढोले यांचेकडून संबंधित मालमत्ता अटकावणीसाठी एच आणि आय फॉर्म निर्गमित करून अटकवाणीचे आदेश देण्यात आले.
त्यानुसार आज दि ५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता, महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांचे निर्देशानुसार, तुर्भे विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. भर धांडे यांच्या नियंत्रणाखाली, अधिक्षक श्री दत्तात्रय काळे यांचेसोबत प्रकाश वाकचौरे, संजय तडवी, पंकज राठोड, प्रकाश झोरे, रोहन घरत व इतर दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अटकावणीच्या कारवाईसाठी डि मार्ट आस्थापनेला भेट दिली. यावेळी डी मार्ट मधील व्यवस्थापकांनी मालमत्ताकर व थकबाकीचा रु. 1,60,75,449/- रक्कमेचा धनादेश देण्याची तयारी दर्शविली. तथापि धनादेश वटण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने महानगरपालिका समुहाने अटकावणीची कारवाई केली.
मात्र डी मार्ट प्रशासनाच्या कायदेविषयक विभागाने अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्याशी संवाद साधून मालमत्ताकराची थकित रक्कमेसह सर्व रक्कम एकरकमी ऑनलाईन भरणा करण्याची तयारी दर्शविली व लगेचच पूर्ण रक्कम रु 1 कोटी 60 लक्ष 75 हजार 449/- मात्र ऑनलाईन भरणा केली. त्यामुळे अटकावणी मागे घेण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मालमत्ता असणा-या सर्व मालमत्ताकर धारकांना करभरणा करणे अनिवार्य असून कररूपाने महानगरपालिकेस दिल्या जाणा-या या निधीतूनच सेवासुविधांची परिपूर्ती केली जात असल्याने नागरिकांनी विहित वेळेत मालमत्ताकर भरणा करावा व थकबाकीदारांनीही आपली थकित रक्कम भरणा करावी व कटू कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 30-01-2024 09:02:08,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update