मराठी भाषेत ज्ञाननिर्मिती करून तिचे संवर्धन करायला हवे – साहित्यिक प्रल्हाद जाधव
मातृभाषा मराठी हा आपल्या अस्तित्वाचा हुंकार असून मराठी भाषेत ज्ञाननिर्मिती करुन तिचे संवर्धन करायला हवे असे सांगत साहित्यिक, वक्ते श्री. प्रल्हाद जाधव यांनी भाषा टिकवण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेवर टाकली जाते, मात्र ती जनतेचीही जबाबदारी असून दोघांनी एकत्रितपणे व त्यात शासनाने समन्वयकाच्या भूमिकेतून भाषा संवर्धनाचे काम केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त आयोजित उपक्रमांतील दुसरे व्याख्यानपुष्प गुंफताना महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती संचालक तथा सुप्रसिध्द लेखक, नाटककार श्री. प्रल्हाद जाधव यांनी ‘वाणी, भाषा, लेखणी… शासकीय कामकाजातील यशाची त्रिवेणी’ या विषयावर उपस्थित नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.
महानगरपालिका शब्दात पालक नाही तर पालिका आहे. म्हणजेच तिच्यात स्त्रित्वाची, आईपणाची भावना आहे. आईपण हे जपणारे असते. त्यात नवी मुंबई हा देखील स्त्रीलिंगी शब्द असल्याने त्यातही आईपण आहे. त्यामुळे दोन आया एकत्र येऊन शहर संगोपनाची भूमिका त्या चांगल्या रितीने जपत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आपली भाषा सर्वांना सामावून घेणारी असल्याने इतर भाषेतील अनेक शब्द आपण सहजगत्या वापरतो. अनेकदा इंग्रजी शब्दांचा अतिवापर करतो. याचा थोडा विचार करुन आपण वापरलेल्या इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द देता आला असता काय ? याचा विचार करुन अनिवार्य तेव्हाच इंग्रजी शबद वापरावा व त्यांचा अतिवापर टाळावा असे त्यांनी सांगितले. आपण विचारांच्या क्षेत्रात काम करणारी माणसं आहोत, त्यामुळे आपली जबाबदारी मोठी असल्याचे सांगत मराठी भाषेची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने ठोस काम करावे असेही आवाहन त्यांनी केले.
जग झपाटयाने पुढे जात असून कृत्रिम बुध्दिमत्तेची (Artificial Intelligence) भीती न बाळगता तिचा अंकुश आपल्या हातात आहे हे विसरता कामा नये असेही ते म्हणाले. आपले मन अत्यंत सृजनशील असून हे अंत:करण विशाल करणे आपल्या हातात असल्याचे ते म्हणाले. एआयला हे माहीत नसून हवा, पाण्याप्रमाणेच भाषा ही इतक्या विपुल प्रमाणात असल्याने तिचे आपल्याला महत्व वाटत नाही असे अधोरखित करीत किती बोलावे व कसे बोलावे याचे तारतम्य राखणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त् केले.
यावेळी त्यांनी राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ सह इतरही महाराष्ट्र गीतांचा अर्थ उलगडून सांगितला. कार्यालयीन कामकाजात शैली पुस्तिका तयार करावी, स्थानिक बोली भाषांमधील शब्दभांडार गोळा करावे तसेच महानगरपालिकेत दर्शनी भागी फळा लावून त्यावर एखादा वेगळा शब्द किंवा म्हण, सुभाषित, वाक्प्रचार लिहून प्रदर्शित करावे अशी तीन उद्दिष्टये त्यांनी नजरेसमोर ठेवली. आपल्यामधील संवेदनाशील असणारा प्रत्यक्ष कृतीशील माणूस दैनंदिन जीवनात मराठी भाषा वापराबाबत जागरुक ठेवायला हवा असेही श्री. प्रल्हाद जाधव यांनी यावेळी सांगितले.
मराठी भाषेच्या कामकाजातील वापराविषयी महत्वाच्या असलेल्या या व्याख्यानाप्रसंगी समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे, उप आयुक्त श्रीम.मंगला माळवे, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी श्रीम. अरुणा यादव, विधी अधिकारी श्री. अभय जाधव तसेच अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार दि. 19 जानेवारी रोजी, सायं 4 वाजता, लेखिका व निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांचे ‘अमेरिका खट्टी मीठी’ हे अनुभवकथनात्मक नाटयअभिवाचन संपन्न होणार असून त्याव्दारे मराठी चष्म्यातून आंबट गोड अमेरिका मांडली जाणार आहे.
Published on : 12-03-2024 12:24:36,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update