नमो महारोजगार मेळाव्याच्या व्यापक प्रचारासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे नियोजन
नोकरी व रोजगाराच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याकरीता तसेच उदयोजकांना आवश्यक असे कुशल व कार्यक्षम मनुष्यबळ प्राप्त करुन देण्याकरीता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता विभागाच्या वतीने ‘नमो महारोजगार मेळावा’ ठाणे येथे 24 व 25 फेब्रुवारी रोजी संपन्न होत असून यामध्ये नवी मुंबईतील युवक – युवती व उदयोजक यांनाही मोठी संधी उपलब्ध होत आहे.
संपुर्ण ठाणे जिल्ह्याला सामावून घेणा-या या नमो महारोजगार मेळावा नियोजनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या वतीने पारित आदेशानुसार नमुंमपा क्षेत्रीय नोडल अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी संबधित विभागप्रमुख व विभाग अधिकारी यांच्याशी संवाद साधत जास्तीत जास्त युवकांनी व व्यावसायिक, उदयोजकांनी या मेळाव्यात सहभागी होण्याच्या दृष्टीने क्षेत्रीय स्तरावर व्यापक माहिती प्रसारणाचे काम करावे असे निर्देश दिले.
त्याचप्रमाणे या मेळाव्याची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी विविध प्रसार माध्यमांचा व समाज माध्यमांचा प्रभावी वापर करावा असेही सूचित करण्यात आले. समाज विकास विभागातील समुह संघटकांमार्फत विभाग पातळीवर तसेच वस्त्यांमध्ये या मेळाव्याची माहिती पोहचविण्याच्या दृष्टीने नियोजन करावे तसेच विभागनिहाय प्रचार, प्रसिध्दी अभियान राबवावे असेही अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी सूचित केले.
या महारोजगार मेळाव्यातून उमेदवाराच्या शैक्षणिक अर्हतेनुसार तसेच कौशल्यानुसार त्यास रोजगाराच्या मोठया संधी उपलब्ध होणार असून याकरिता उमेदवारांनी महास्वयम या शासकीय पोर्टलवर https:/rojgar.mahaswayam.gov.in नोंदणी करावयाची आहे. सदर माहिती नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रोजगाराभिमुख घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याचे अतिरिक्त आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.
त्याचप्रमाणे या नमो महारोजगार मेळाव्यात नमुंमपा कार्यक्षेत्रातील मॉल, बांधकाम व्यावसायिक, हॉस्पिटॅलिटी संस्था, हाउसकिपींग संस्था, कॉल सेंटर्स अशा विविध आस्थापनांकडूनही त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती महास्वयम पोर्टलवर अपलोड करण्याच्या दृष्टीने त्यांना या विषयीक माहिती देऊन प्रोत्साहित करण्याचे सूचित करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त युवकांना या नमो महारोजगार मेळाव्याचा लाभ मिळावा यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका विविध माध्यमातून प्रयत्नशील आहे.
Published on : 20-03-2024 11:41:59,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update