नवी मुंबई महानगरपालिका पथनाट्यांव्दारे करीत आहे लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन
जनजागृतीच्या विविध माध्यमांमध्ये पथनाट्य हे अत्यंत प्रभावी माध्यम असून 20 मे रोजी होणा-या 25 ठाणे लोकसभा निवडणूकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे या अनुषंगाने स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांमध्ये पथनाट्याचाही प्रभावी वापर करण्यात येत आहे.
या पथनाट्यांतील कलावंत समुह महापालिका क्षेत्रात संध्याकाळच्या सत्रात गर्दीच्या ठिकाणी जाऊन चौकाचौकात लोकशाहीचा जागर करीत निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. मनोरंजक पध्दतीने सादर होणारी ही पथनाट्ये मतदान करण्याचे महत्व हसतखेळत पटवून देत आहेत. हा लोकशाहीचा उत्सव आपण सर्वांनी मिळून साजरा करावयाचा असून मतदान करून आपल्याला संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार बजावयाचा आहे हे लोकांना पथनाट्याव्दारे पटवून दिले जात आहे.
वाशी विभागात रेल्वे स्टेशन परिसर, मिनी सी शोअर सेक्टर 9, सेक्टर 9 मार्केट, सेक्टर 15 मार्केट, सेक्टर 10 चौक तसेच नेरूळ विभागात रेल्वे स्टेशन पश्चिम बाजू आणि पूर्व बाजू, सेक्टर 10 पूर्व, नेरूळ गाव, नेरूळ सेक्टर 20 चौक अशा विविध ठिकाणी झालेली पथनाट्ये बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पथनाट्ये सादर केल्यानंतर नागरिकांनी टाळ्यांची दाद देत कलावंतांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. यावेळी उपस्थित प्रेक्षक नागरिकांनी डाव्या हाताची तर्जनी उंचावत सामुहिक सेल्फी काढून आपण मतदान करणार असल्याचे दर्शविले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बेलापूर ते दिघा अशा आठही विभागांमध्ये गर्दीच्या ठिकाणी पथनाट्ये सादर करून मतदार जनजागृती केली जात असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक उपआयुक्त श्री.शरद पवार यांनी दिली आहे.
Published on : 30-05-2024 10:49:53,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update