सोसायट्या, शाळा, मार्केट, हॉटेल्स, शासकीय कार्यालये व हॉस्पिटल स्तरावर स्वच्छता स्पर्धेव्दारे प्रोत्साहन
“स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत लोकसहभागातून स्वच्छताविषयक उपक्रम राबविणे व या माध्यमातून नागरिकांच्या स्वच्छताविषयक वर्तणुकीमध्ये बदल घडविण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना कचरा वर्गीकरण व ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया तसेच इतर स्वच्छताविषयक उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन देणे तसेच या बाबींमध्ये सातत्य ठेवून नागरिकांच्या सवयीत बदल घडविण्याच्या दृष्टीने नवी मुंबई शहरातील (1) गृहनिर्माण संस्था / RWA, (2) शाळा (खाजगी व नवी मुंबई महानगरपालिका), (3) मार्केट असोसिएशन, (4) हॉटेल्स, (5) शासकीय कार्यालये व (6) हॉस्पिटल या प्रमुख सहा गटांमध्ये ‘स्वच्छता स्पर्धा’ आयोजन करण्यात येत आहे.
या स्पर्धेचे गुणांकन करण्याकरिता ठराविक निकष निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये प्रामुख्याने निर्मितीच्या ठिकाणीच कचरा वर्गीकरण (Source Segregation), कचरा निर्मितीच्या ठिकाणीच कच-यावर प्रक्रिया करणे, शौचालय व्यवस्थापन, स्वच्छता विषयक पायाभूत सुविधा तसेच सध्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सफाई अपनाओ बिमारी भगाओ या अभियानाच्या अनुषंगाने विविध आजारांचा प्रसार रोखण्याकरिता पावसाळी कालावधीमध्ये करण्यात आलेल्या नियमांचे पालन अशा विविध बाबींवर भर देण्यात आलेला आहे.
या स्वच्छता स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणा-या गृहनिर्माण संस्था / RWA, शाळा (खाजगी व नमुंमपा), मार्केट असोसिएशन, हॉटेल्स, शासकीय कार्यालये व हॉस्पिटल या संस्थांना 11 ते 19 जुलै 2024 या कालावधीत संबंधित विभाग कार्यालयात अर्ज करता येणार आहेत. या स्पर्धेचे प्रत्यक्ष स्थळ परीक्षण व गुणांकन दिनांक 22 जुलै ते 02 ऑगस्ट 2024 या कालावधीत करण्यात येणार आहे.
या स्वच्छता स्पर्धेमध्ये नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग अपेक्षित असून नागरिकांना प्रोत्साहन मिळावे याकरीता विभाग स्तरावरून निवड करण्यात आलेल्या प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ गृहनिर्माण संस्थांना अनुक्रमे रु.21 हजार, रु.15 हजार व रु.11 हजार रक्कमेची रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रासह प्रदान करण्यात येणार आहेत.
स्वच्छ शाळा स्पर्धेच्या खाजगी व नवी मुंबई महानगरपालिका गटांतील प्रथम व व्दितीय विजेत्या शाळांना विभागीय स्तरावर अनुक्रमे रु.15 हजार व रु.11 हजार रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे महापालिका स्तरावरील विजेत्या प्रथम, व्दितीय व तृतीय स्वच्छ गृहनिर्माण संस्थांना अनुक्रमे रु.51 हजार, रु.41 हजार व रु.31 हजार रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छ शाळा स्पर्धेच्या (खाजगी व नमुंमपा) गटांतील प्रथम, व्दितीय व तृतीय विजेत्या शाळांना अनुक्रमे रु.25 हजार, रु.21 हजार व रु.11 हजार रोख बक्षिस, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
स्वच्छ मार्केट स्पर्धेकरिता प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक विजेत्या मार्केट असोसिएशनला अनुक्रमे रु.25 हजार, रु.21 हजार व रु.11 हजार रोख बक्षिस, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
स्वच्छ स्पर्धेतील हॉटेल, शासकीय कार्यालय आणि हॉस्पिटल या विभागातील प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना विभाग स्तरावर तसेच मुख्यालय स्तरावर स्वतंत्रपणे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
स्वच्छता ही दैनंदिन जीवनातील नियमित सवय व्हावी जेणेकरून शहर स्वच्छतेला बळकटी येईल या भूमिकेतून सोसायट्यांपासून ते पर्यटक मोठ्या संख्येने येतात अशा हॉटेलसारख्या व्यावसायिक संस्थांना स्वच्छतेच्या दृष्टीने प्रोत्साहित करण्यासाठी गृहनिर्माण संस्था / RWA, शाळा, मार्केट असोसिएशन, हॉटेल्स, शासकीय कार्यालये व हॉस्पिटल या 6 गटांमध्ये स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील संस्थांनी या स्वच्छता स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत “स्वच्छ महाराष्ट्र अभियान” व “स्वच्छ नवी मुंबई मिशन” यशस्वीपणे राबविण्यामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 18-07-2024 14:51:32,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update