पेपरलेस प्रशासनासाठी नमुंमपा कर्मचाऱ्यांना ई-ऑफिस कार्यप्रणालीचे विशेष प्रशिक्षण
नवी मुंबई महानगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजात अधिक सुसूत्रता यावी व नागरी सेवा व सुविधांच्या पूर्ततेत गतीमानता व पारदर्शकता येऊन त्याचा नागरिकांना लाभ व्हावा यादृष्टीने नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार महानगरपालिका कामकाजात ई-ऑफिस कार्यप्रणाली राबविण्याबाबत जलद पावले उचलण्यात येत असून त्यादृष्टीने अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे.
नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्र येथे हे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले असून एनआयसी या शासकीय संस्थेमार्फत ई-ऑफिस प्रणालीचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार यांनी ई-ऑफिस कार्यप्रणालीमुळे आपल्या कार्यालयातील पत्रव्यवहार, कागदपत्रे, टिपण्या, नस्तींच्या नोंदी आदी सर्व कामकाज संगणकीय रितीने होणार असून याव्दारे नस्ती व कागदपत्रे शोधण्यातील वेळ वाचेल असे सांगितले. त्याचप्रमाणे या प्रणालीत सर्व माहिती जलद गतीने त्वरित प्राप्त होणार आहे व त्यामुळे महानगरपालिकेच्या कामकाजाला सुनियोजितपणा येऊन निर्णय प्रक्रिया सुलभ झाल्याने गतीमानता येणार आहे असेही ते म्हणाले. म्हणूनच प्रशिक्षणातून प्राप्त होणारे ई-ऑफिस कार्यप्रणालीचे ज्ञान गांभीर्याने घ्यावे व त्याचा उपयोग दैनंदिन कामकाजात प्रभावीपणे करावा असे त्यांनी अधिकारी, कर्मचारी यांना सूचित केले.
प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात परिमंडळ -1 व 2 विभागातील तसेच आठही विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी तसेच प्रशासन, समाजविकास, घनकचरा व्यवस्थापन, मालमत्ताकर, अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी दुस-या सत्रात प्रशिक्षणाचा लाभ घेतला. एनआयसीचे प्रशिक्षक श्री.दिपक साळवे व श्री.गौतम मोरे यांनी सादरीकरणाव्दारे ई-ऑफिस प्रणालीव्दारे कामकाज करण्याविषयी सविस्तर माहिती दिली. अशाप्रकारे 18 जुलै व 19 जुलै रोजी दोन सत्रात सर्व विभागांना ई-ऑफिस कार्यप्रणालीची सादरीकरणाव्दारे माहिती दिली जाणार असून 22, 23 व 24 जुलै रोजी वेळापत्रकानुसार प्रात्यक्षिक स्वरुपात प्रशिक्षण दिले जाणार आहे.
ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावीपणे वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाला गती देण्यात येत असून ऑगस्ट महिन्यापासून महानगरपालिकेचे कार्यालयीन कामकाज पेपरलेस होईल यादृष्टीने नियोजनबध्द कार्यवाही करण्यात येत आहे.
Published on : 22-07-2024 06:47:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update