नवी मुंबईतील गावठाण भागांमध्ये सखोल स्वच्छता मोहीमा
स्वच्छतेमधील मानांकन उंचावण्याचा ध्यास घेऊन ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ ला सामोरे जाताना नवी मुंबई महानगरपालिका नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून स्वच्छता उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत आहे.
स्वच्छ भारत मिशनने जाहीर केलेल्या ‘सफाई अपनाओ - बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात व्यापक प्रमाणात ‘सखोल स्वच्छता मोहिमा’ राबविण्यास सुरुवात केली असून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांपासून विदयार्थ्यांपर्यंत आबालवृध्द नागरिक उत्साहाने सहभागी होत असल्याचे चित्र दिसून येते. या अनुषंगाने आठही विभाग कार्यालय क्षेत्रात वर्दळीच्या तसेच काहीशा दुर्लक्षित ठिकाणांवर एकाच वेळी सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यास सुरुवात झाली आहे.
त्यानुसार आज सर्व विभाग कार्यालय क्षेत्रातील गावठाण भागांमध्ये व काही गावठाणांलगतच्या भागांमध्ये स्थानिक नागरिकांच्या सहभागातून सखोल स्वच्छता मोहीमा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, परिमंडळ 2 उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आल्या.
यामध्ये बेलापूर विभागात दिवाळे गाव, नेरुळ विभागात शिरवणे गाव, वाशी विभागात जुहू गाव, तुर्भे विभागात तुर्भे गाव, कोपरखैरणे विभागात महापे हनुमान नगर, घणसोली विभागात कातकरीपाडा डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, ऐरोली विभागात यादव नगर व दिघा विभागात संजय गांधी नगर भागात सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या.
यामध्ये स्थानिक नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभागी होत आपल्या परिसराच्या स्वच्छतेसाठी सक्रीय योगदान दिले. यावेळी महानगरपालिकेच्या स्वच्छता अधिका-यांच्या वतीने नागरिकांना कचरा वर्गीकरणाचे तसेच एकल प्लास्टिक वापराच्या प्रतिबंधाचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी सर्वांनी सामुहिकपणे स्वच्छतेची, पर्यावरण संर्वधनाची व एकल वापर प्लास्टिक न वापरण्याची शपथ घेतली.
अशाच प्रकारच्या सखोल स्वच्छता मोहीमा सर्वंच गावठाण क्षेत्रामध्ये राबविण्यात येणार असून गावठाण भागातील नागरिकांमध्ये या मोहीमांमध्ये सहभागी करुन घेतले जाणार आहे. या मोहीमांचे सर्व विभागांचे सहा आयुक्त् तथा विभाग अधिकारी डॉ अमोल पालवे, श्री. सागर मोरे, श्री. भरत धांडे, श्री सुनिल काठोळे, श्री संजय तायडे, श्री अशोक अहिरे, डॉ कैलास गायकवाड यांनी स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षकांसह सुयोग्य नियोजन केले.
याशिवाय घणसोली विभागात सहा आयुक्त तथा विभाग अधिकारी संजय तायडे, स्वच्छता अधिकारी श्री. विजय पडघन यांच्यासह स्वच्छता निरीक्षक व अधिकारी-कर्मचारी यांच्या माध्यमातून मदर टेरेसा स्कुल सेक्टर 5 व नमुंमपा शाळा क्रमांक 42 यांच्या सहयोगातून घणसोली विभागात स्वच्छता व वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये स्वच्छतेसह वृक्षारोपण व संवर्धन, प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करणे, कच-याचे ओला सुका व घातक असे घरापासूनच वर्गीकरण करणे अशा विविध महत्वाच्या बाबींवर घोषवाक्य लिहिलेले फलक उंचावत, घोषणा देत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.
अशाच प्रकारचा उपक्रम कोपरखैरणे विभागात नमुंमपा शाळा क्रमांक 106 यांच्यासह सहा आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. सुनिल काठोळे तसेच स्वच्छता अधिकारी श्री.राजुसिंग चव्हाण यांच्या पुढाकारातून शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थी यांच्या सहभागातून राबविण्यात आला.
तसेच नेरुळ सेक्टर 3 येथील रोज बाजार या ठिकाणी सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ अमोल पालवे, स्वच्छता अधिकारी श्री. अरुण पाटील तसेच स्वच्छता निरीक्षक व अधिकारी-कर्मचारी यांनी तेथील व्यावसायिकांचे प्लास्टिक बंदीविषयी प्रबोधन केले. तसेच यावेळी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या मोहिमेप्रसंगी स्टर्लिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाटय सादरीकरण करत स्वच्छता व प्लास्टिक प्रतिबंधाविषयी जनजागृती केली.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईत ठिकठिकाणी सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात येत असून त्यामध्ये नागरिक व विशेषत्वाने विद्यार्थी स्वयंस्फुर्तीने मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
Published on : 22-07-2024 07:30:18,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update