एनएमएमटी बसेस व बस स्टॉपवरही ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेची व्यापक प्रचार
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेची माहिती नवी मुंबईतील सर्व महिलांपर्यंत पोहोचावी व या योजनेचा लाभ नवी मुंबईतील प्रत्येक पात्र महिलेला मिळावा यादृष्टीने नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध माध्यमांतून योजनेची प्रचार व प्रसिध्दी करण्यात येत आहे.
यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या एनएमएमटी बसेस व बसस्टॉपवरही व्यापक प्रचार - प्रसिध्दी करण्यात आलेली आहे. नवी मुंबईसह आसपासच्या ठाणे, मुंबई, पनवेल, उरण, कल्याण - डोंबिवली ते अगदी अंबरनाथ – बदलापूर - खोपोली - कर्जत पर्यंत एनएमएमटी प्रवासी सेवा दिली जात आहे.
त्या अनुषंगाने काही एनएमएमटी बसेसवर चारही बाजूने योजनेचे माहितीप्रद पॅनल प्रदर्शित करून बसेस आकर्षकरित्या सजविण्यात आल्या आहेत. तसेच बसेसच्या बॅक पॅनलवरही योजनेचे माहितीप्रद फलक प्रदर्शित करण्यात आले आहेत. याशिवाय एनएमएमटी बसेसमधील ध्वनीक्षेपक यंत्रणेवरूनही ध्वनीफितीव्दारे योजनेचा व्यापक प्रचार केला जात आहे. त्याचप्रमाणे एनएमएमटीच्या बसस्टॉपवरही योजनेची माहिती बॅनर्सव्दारे प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे नवी मुंबईसह या बसगाडयांव्दारे एनएमएमटी बसेस ज्या ज्या शहरात जातात तेथेही योजनेचा व्यापक प्रचार होत आहे.
Published on : 22-07-2024 07:59:01,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update