अतिवृष्टीच्या अनुषंगाने नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्रत्यक्ष स्थळ भेटी देत केली नवी मुंबईतील पावसाळी स्थितीची पाहणी नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन मदत यंत्रणा क्षेत्रामध्ये कार्यरत
दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर तसेच हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाराच्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शहरात ठिकठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करीत तसेच महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन मध्यवर्ती केंद्रातून व सीसीटिव्ही कमांड सेंटरमधून पावसाळी स्थितीवर बारीक लक्ष ठेवत संबंधित यंत्रणेने क्षेत्रामध्ये जाऊन पाणी साचलेल्या ठिकाणी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने परिमंडळ उपआयुक्तांच्या नियंत्रणाखाली सर्व विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रात दक्षतेने कार्यरत होते.
यावेळी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार व अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड आणि आपत्कालीन विभागाचे उपायुक्त श्री. शरद पवार उपस्थित होते. मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून आयुक्तांनी नवी मुंबई शहरातील पर्जन्यस्थितीचा व परिस्थितीचा आढावा घेतला आणि सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनाही कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन सोशल माध्यमांतून करण्यात आले.
नवी मुंबई शहर समुद्रसपाटीखाली वसलेले असल्याने उधाण भरतीची वेळी मुसळधार पाऊस असल्यास शहराच्या काही सखल भागात पाणी साचते, याची दखल घेत महानगरपालिकेच्या मदतकार्य यंत्रणेस आपल्या क्षेत्रात सज्ज राहण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. आज दुपारी 12.10 वा. 4.44 मीटर इतकी उधाण भरती होती व त्याचवेळी पाऊस संततधार कोसळत होता. त्या अनुषंगाने आयुक्तांनी स्वत:ही फिरून प्रत्यक्ष परिस्थिती बघितली व यंत्रणेला गतीमान केले. या दरम्यान अतिवृष्टीमुळे पाणी साचलेल्या काही ठिकाणी स्वत: उभे राहून आयुक्तांनी पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने पदपथावरील गटारांची झाकणे उघडून मोठ्या प्रमाणात वाहत येणारे पाणी रस्त्यावर साचून राहू नये म्हणून वाहत्या पाण्याला मोकळी वाट करून देण्याचीही कार्यवाही आपल्या देखरेखीत करून घेतली.
सीबीडी बेलापूर येथील सेक्टर 8 बी जय दुर्गा मातानगर याठिकाणच्या धबधब्याच्या परिसरात 60 हून अधिक पर्यटक अडकले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षास समजल्यानंतर अग्निशमन व आपत्कालीन यंत्रणेला पोलीसांसह मदतकार्यासाठी पाठवत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्वत:ही प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. तेथे अडकलेल्या सर्व नागरिकांना सुरक्षित परत आणण्यात आले आहे. अशाचप्रकारे पावणे एमआयडीसी परिसरात अडकलेल्या दोन नागरिकांचीही महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने पोलीसांच्या मदतीने सुरक्षितपणे सोडवणूक केलेली आहे.
आयुक्तांनी नमुंमपा मुख्यालयातील सीसीटिव्ही कमांड सेंटरची पाहणी करीत तेथील सीसीटिव्ही यंत्रणेव्दारे शहरातील विविध भागांतील परिस्थितीची बारकाईने पाहणी केली. ज्या ठिकाणी पाणी साचले आहे असे निदर्शनास आले तेथील विभाग कार्यालयातील मदत पथकांना सूचना देण्यात येऊन पाणी साचून राहणार नाही याची तत्पर कार्यवाही करण्यासाठी रवाना करण्यात आले व त्या कार्यवाहीचीही माहिती घेण्यात आली. सीसीटिव्ही यंत्रणेचा पावसाळी कालावधीत आपत्कालीन उपाययोजनांसाठी प्रभावी वापर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले व सतर्क राहण्याचे सूचित केले.
आज 21 जुलै रोजी सकाळी 8.30 ते सायं. 5.30 वा. पर्यंत नवी मुंबईत सरासरी 95.88 मिमी पावसाची नोंद झाली असून बेलापूर विभागात 145.00 मिमी, नेरूळ विभागात 92.05 मिमी, वाशी विभागात 119.80 मिमी, कोपरखैरणे विभागात 130.95 मिमी, ऐरोली विभागात 39.80 मिमी, दिघा विभागात 47.70 मिमी पावसाची नोंद झालेली आहे.
हे पर्जन्यमान मागील 3 दिवसांपासून मोठे असून 20 जुलै रोजी सकाळी 8.30 ते 21 जुलै रोजी सकाळी 8.30 वा. पर्यंत 85.87 मिमी, 19 जुलै रोजी सकाळी 8.30 ते 20 जुलै रोजी सकाळी 8.30 वा. पर्यंत 75.17 मिमी पर्जन्यवृष्टी झालेली आहे. या पावसाळी कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 21 जुलै रोजी सायं. 5.30 पर्यंत एकूण 1273.26 मिमी इतकी पर्जन्यवृष्टी नोंद झालेली आहे.
हवामान खात्याकडून देण्यात आलेली अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी महत्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये अथवा अतिमहत्त्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावे. पुढील 3 दिवस 4.5 मीटरपेक्षा जास्त क्षमतेची उधाण भरती असल्याने व आपले नवी मुंबई शहर समुद्रसपाटीपासून खालच्या भागात असल्यामुळे त्याच काळात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्यास काही सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.
तरी नागरिकांनी अतिवृष्टीच्या काळात सतर्क राहून सहकार्य करावे व अडचणीच्या काळात काही मदतीची आवश्यकता असल्यास नवी मुंबई महानगरपालिकेच्या नजिकच्या विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा महानगरपालिकेच्या मुख्यालयातील मध्यवर्ती आपत्ती नियंत्रण कक्षाशी 022-27567060 / 27567061 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 18222309 / 1800222310 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 22-07-2024 08:06:57,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update