श्वान पाळावयाचे असल्यास संबंधित विभाग कार्यालयामार्फत श्वान परवाना घेणे आवश्यक
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वान मालकांकरिता जाहीर प्रकटन प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील प्रकरण 11- कलम 149 (1) व 127 कलम 2 (क) अन्वये 'नमुंमपा कुत्र्यावरील कर नियमन 1993' ही उपविधी लागू करण्यात आलेली आहे व सदर उपविधीस शासन निर्णय क्र.एनएमसी 1692/410/सीआर48/92 नवी-20, दि. 28 में 1993 अन्वये शासन मान्यता मिळालेली आहे असे प्रसिध्द करण्यात आलेले आहे.
या उपविधीनुसार विभाग कार्यालयांमार्फत विभाग अधिकारी यांच्या स्वाक्षरीने श्वान परवाने देण्याची कार्यवाही करण्यात येते असे सूचित करण्यात आलेले असून त्या अनुषंगाने सर्व पाळीव श्वान मालकांनी श्वान परवाना प्राप्तीसाठी संबंधित विभाग कार्यालयाकडे अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना श्वान पाळावयाचे असल्यास त्यास श्वान परवाना घेणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने अनधिकृतपणे श्वान पाळणाऱ्या मालकांविरुध्द कारवाई करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे महानगरपालिकेच्या वतीने जाहीर प्रकटनाव्दारे सूचित करण्यात आले आहे.
Published on : 25-07-2024 13:08:43,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update