नवी मुंबईत नेरूळ, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली विभागात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकाम विरोधात मोहीम तीव्र करण्यात आलेली असून नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली नेरूळ, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली विभागांत 6 बांधकांमावर तोडक कारवाई करण्यात आली.
महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 54 अन्वये नोटीस देऊनही संबंधितांनी नोटीशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात आली. यामध्ये नेरूळ विभागात राजेंद्र रामा भगत व अनिल रामा भगत यांचे घर क्र. 207/208 लोट्स अपा. नेरूळ येथील बांधकाम हटविण्यात आलेले आहे.
तसेच कोपरखैरणे विभागात सेक्टर 4 कोपरखैरणे येथे रूम नं. 994 येथील पी.जी.सालेकर यांचे अनधिकृत वाढीव बांधकाम तसेच रूम नं. 993 येथे कमलदेव रंगनाथ यादव यांचे अनधिकृत वाढीव बांधकाम निष्कासित करण्यात आले.
घणसोली विभागातील गणेश सहदेव सुके यांचे बांधकाम तसेच विजय बहादूर सिंग यांच्या अनधिकृत बांधकामवर कारवाईचा हातोडा पडला.
ऐरोली विभागातही सेक्टर 2 येथे संतोष कांबळे यांनी केलेले वाढीव बांधकाम तोडून टाकण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार, उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरूळ विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.अमोल पालवे व अभियंता राजू हळंदे तसेच कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.सुनिल काठोळे व अभियंता श्री. सचिन नामवाड, घणसोली विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.संजय तायडे व अभियंता श्री.रोहित ठाकरे, ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.अशोक अहिरे व कनिष्ठ अभियंता श्री.राज नागरगोजे यांच्या उपस्थितीत या तोडक कारवाया करण्यात आल्या. या मोहीमेसाठी पोलीस बंदोबस्तात आवश्यक मजूर, पोकलन, गॅस कटर, ब्रेकर, जेसीबी इत्यादींचा वापर करण्यात आला.
अशाप्रकारे काल रविवारी एकाच दिवसात विविध विभागांमध्ये केलेल्या 8 अनधिकृत बांधकामांवरील धडक कारवाईनंतर आजही 6 अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात आलेली असून यापुढील काळात कारवाया तीव्रतेने राबविण्यात येणार आहेत.
Published on : 30-07-2024 08:17:07,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update