‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अर्ज छाननी प्रक्रियेला नवी मुंबई महापालिका मुख्यालयात वॉर रुमव्दारे गती
Ø महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणा-या ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकही पात्र महिला वंचित राहू नये याकरिता नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय स्तरापर्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून त्याबाबत सातत्याने आढावा घेतला जात आहे.
Ø यामध्ये जास्तीत जास्त महिलांपर्यंत योजनेची माहिती पोहोचवून पात्र महिलांकडून अर्ज भरुन घेण्यात येत असून त्याचवेळी प्राप्त अर्जांची पडताळणी सुरु करण्यात आलेली आहे. जेणेकरुन सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल केलेल्या पात्र महिलांना योजनेचा लाभ पहिल्या टप्प्यातच उपलब्ध होईल.
Ø या अनुषंगाने पोर्टलवरील महिला लाभार्थ्यांच्या प्राप्त अर्जांची जलद गतीने छाननी करुन त्यांना योजनेचा लाभ मिळण्याकरिता आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नमुंमपा मुख्यालयामध्ये दोन वॉर रूम स्थापन करण्यात आलेल्या आहेत.
Ø याठिकाणी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व समाज विकास विभागाचे उपआयुक्त तथा योजनेचे नोडल अधिकारी श्री. किसनराव पलांडे व सहा. नोडल अधिकारी श्री. प्रबोधन मवाडे यांच्यासह भेट देत कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली व कामाला नियोजनबध्द गती देण्याचे निर्देशित केले.
Ø दि. 31 जुलै, 2024 पर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेने 111 प्रभागांमध्ये स्थापन केलेल्या अंगणवाडी केंद्रासह एकुण 329 ठिकाणांहून ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचे ऑनलाईन 27,046 व ऑफलाईन 21,583 असे एकूण 46,629 अर्ज प्राप्त झालेले आहेत.
Ø सदर प्राप्त अर्जांची पडताळणी वार्डस्तरीय समितीमार्फत करण्यात येत आहे. या संदर्भात आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार उपआयुक्त, समाजविकास श्री. किसनराव पलांडे यांनी सर्व विभागांचे सहा. आयुक्त यांची ऑनलाईन बैठक घेऊन तांत्रिक अडचणींबाबतच्या शंकांचे निरसन केले आहे व सर्व विभाग अधिकारी यांनी जास्तीत जास्त ऑनलाईन अर्जांची छाननी करावी असे निर्देशित केले आहे.
Ø याशिवाय प्राप्त अर्जांची छाननी आणखी जलद गतीने व्हावी याकरिता आयुक्तांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयामध्ये 02 ठिकाणी वॉर रुमची स्थापना करण्यात आलेली असून 40 कर्मचा-यांची 2 सत्रात नेमणूक करण्यात आलेली आहे. याकरिता सकाळी 8 ते दुपारी 3 तसेच दुपारी 3 ते रात्री 10 अशा 2 सत्रात छाननीचे काम सुरू करण्यात आलेले आहे.
Ø ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये बॅनर, पोस्टर, होर्डींग, हँडबिल तसेच सोशल मिडीया व वर्तमानपत्रे अशा विविध माध्यमांतून व्यापक जनजागृती करण्यात आलेली असून समुह संघटक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या मार्फतही महिला बचत गट व महिलांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन योजनेची माहिती दिली जात आहे व अर्ज भरुन घेतले जात आहे.
Ø ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेमधील पात्र महिलांना लवकरात लवकर लाभ मिळावा याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार अर्ज भरुन घेणे तसेच पोर्टलवर दाखल अर्जांची छाननी करणे या दोन्ही कामांना समांतर गती दिलेली आहे.
तरी ज्या पात्र महिलांनी अद्याप अर्ज दाखल केलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून दरमहिना रू. 1500/- मात्र इतक्या रक्कमेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 01-08-2024 12:28:24,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update