एनआरआय फेज 2 मधील घनकचरा प्रकल्पाची आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्याकडून पाहणी
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये घरातूनच ओला, सुका व घऱगुती घातक अशा तीन प्रकारे कचरा वर्गीकरण करण्यात येत आहे त्याचप्रमाणे दररोज 100 मेट्रीक टनाहून अधिक कचरा निर्माण करणा-या मोठ्या संस्था, सोसायट्या, हॉटेल्स यांनी आपल्या ओल्या कच-यावर आपल्याच आवारात प्रक्रिया करणे घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार आवश्यक असून त्याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच आघाडीवर राहिली असून यामध्ये स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा मोठा वाटा राहिला आहे. यावर्षीही स्वच्छ सर्वेक्षण 2023 ला सामोरे जात असताना निश्चय केला – नंबर पहिला हे आपले ध्येयवाक्य नजरेसमोर ठेवून वाटचाल सुरु आहे.
या अनुषंगाने नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्यामार्फत स्वच्छता कार्यवाहीकडे विशेष लक्ष दिले जात असून नुकतीच आयुक्तांनी स्वच्छताविषयक आढावा बैठक घेऊन प्रत्येक घटकाने स्वच्छता मोहिमेला अधिक वेग देण्याचे निर्देश दिले होते.
यादृष्टीने प्रत्येक विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच विभागनिहाय नियुक्त विभागप्रमुख दर्जाचे नोडल अधिकारी यांनी आपापल्या क्षेत्राचा नियमित पाहणी दौरा करून स्वच्छतेमध्ये जाणवणा-या त्रुटी संबंधितांच्या निदर्शनास आणून देऊन त्याचे त्वरीत निराकरण करण्याबाबत सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या.
यासोबतच स्वत: आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्यामार्फतही विविध विभागांतील स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे. यानुसार आयुक्तांनी आज स्वच्छ सर्वेक्षणाच्या सिटी प्रोफाईलमध्ये असलेल्या मोठ्या प्रमाणावर कचरा निर्मिती होणा-या (BWG) एनआरआय कॉम्प्लेक्स फेज 2 मधील सीवूड इस्टेट सोसायटीला अचानक भेट देत तेथील कचरा विल्हेवाट प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
एनआरआय कॉम्प्लेक्स ही नवी मुंबई क्षेत्रातील अतिशय मोठी सोसायटी असून येथील फेज 2 मध्ये 500 कि.ग्रॅ. क्षमतेची कंपोस्ट पीट्स बनविण्यात आली आहेत. सोसायटीमधून दररोज संकलीत होणारा ओला कचरा पीट्समध्ये टाकला जात असून त्यापासून खत निर्मिती करण्यात येत आहे. दररोजच्या सरासरी 400 कि.ग्रॅ. ओल्या कच-यापासून निर्माण होणारे खत सोसायटीच्या आवारातील उद्यान व हिरवाई विकसित करण्यासाठी वापरले जात असून त्यामुळे कच-याची निर्मितीच्या ठिकाणी विल्हेवाट लावली जाते व कचरा वाहतूक खर्चात बचत होते.
याठिकाणी ओल्या कच-यापासून होणा-या खत निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया आयुक्त महोदयांनी +समजून घेतली व सोसायटीमध्ये दैनंदिन निर्माण होणा-या ओल्या व सुक्या कच-याचे तपशील तपासले. त्याचप्रमाणे त्याठिकाणी उपस्थित सोसायटीतील रहिवाशांशी संवाद साधत कचरा वर्गीकरण व कच-याची विल्हेवाट सोसायटीच्या आवारातच लावण्याचे अत्यंत चांगले काम आपण करीत आहात अशी प्रशंसा केली. स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने हे सातत्य आपण असेच टिकवून ठेवावे असे आवाहन आयुक्तांनी यावेळी रहिवाशांना केले.
पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने पूर्ण झालेल्या नैसर्गिक नालेसफाई व बंदिस्त गटारे सफाई यांचीही पाहणी आयुक्त श्री. राजेश नार्वेकर करणार असून स्वच्छताविषयक कामांकडेही स्वत: बारकाईने लक्ष देत आहेत. याव्दारे नवी मुंबईतील स्वच्छता कामांना अधिक गती प्राप्त झालेली आहे.
Published on : 07-06-2023 11:37:18,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update