आर.टी.ई. ऍ़क्ट 2009 अंतर्गत 25% आरक्षित जागेवर प्रवेश प्रकिया सन 2020-21
आर.टी.ई. अंतर्गत 25% आरक्षित मोफत प्रवेशाची ऑनलाईन सोडत दिनांक 17 मार्च 2020 रोजी जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र, कोव्हीड-19 या साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला होता. लॉकडाऊनमुळे निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होऊ शकली नाही. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दिनांक 17 जून 2020 रोजीच्या पत्रान्वये कागदपत्रे पडताळणी व प्रवेशाबाबत कार्यवाही करणेसाठीची प्राथमिक जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सोपविण्यात आलेली आहे. त्यानुसार पालकांनी प्रवेशाबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी असे सूचित करण्यात येत आहे.
- शाळेचा प्रवेशाबाबत संदेश आल्यानंतर त्या दिनांकास सर्व मूळ आवश्यक कागदपत्रे व एक छायांकित प्रत घेऊन शाळेत उपस्थित रहावे. कागदपत्रांच्या पडताळणीस अधीन राहून शाळा तात्पुरता प्रवेश निश्चित करण्यात येईल. प्रवेशाबाबत शासनाने निश्चित केलेले हमीपत्र भरुन शाळेस द्यावे.
- शाळेने दिलेल्या दिनांकास उपस्थित राहता येणे शक्य नसल्यास, शाळेला तसे कळविण्यात यावे व पुढील दिनांकाची मागणी शाळेकडे करावी. उपस्थित राहण्यास तीन वेळा संधी मिळणार असून त्यानंतर संधी देण्यात येणार नाही, याची नोंद घेण्यात यावी.
- शाळेच्या संदेशावर अवलंबून न राहता आर.टी.ई. पोर्टलवर बालकाचा अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाच्या दिनांकाची खात्री करावी.
- पडताळणी समितीस कागदपत्रे चुकीची आढळून आल्यास व आर.टी.ई. पोर्टलवर चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास हमीपत्रातील अटीप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
- शाळा कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात असल्यास अथवा शाळा अन्य कामासाठी प्रशासनाने ताब्यात घेतली असल्यास अशा शाळांमध्ये प्रतिबंधित क्षेत्रातील अटी शिथील झाल्यानंतर प्रवेशाबाबत कार्यवाही करण्यात येईल.
- प्रतिक्षा यादीतील पालकांना सध्या बोलाविण्यात येणार नाही. त्यासाठी स्वतंत्र सूचना देण्यात येतील.
- आर.टी.ई. पोर्टलवर पालकांसाठी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
शाळेच्या प्रवेशाबाबत संदेश / फोन आल्यास वा ऑनलाईन पोर्टलवर प्रवेशाचा दिनांक दिसून आल्यास त्याच दिनांकास शाळेत जावे, तोपर्यंत शाळेत गर्दी करु नये. सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्यात यावे. शाळेत येताना मास्क लावणे अनिवार्य राहील.
पालकांनी सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून त्यांना ज्या दिनांकास बोलाविण्यात आलेले आहे, त्या दिनांकास शाळेत जावून प्रवेश घेणेबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 24-06-2020 15:55:44,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update