स्वच्छ सर्वेक्षण - 2021 बाबत ऑनलाईन माहिती व प्रशिक्षण कार्यक्रम
स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये देशातील 7 व्या व राज्यातील 1 ल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त् झाले असून स्वच्छ सर्वेक्षण - 2020 चा निकाल अदयाप जाहीर झालेला नाही. याशिवाय कचरामुक्त शहरांच्या श्रेणीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस 5 स्टार रेटींग प्राप्त् झाले असून असे रेटींग प्राप्त् करणाऱ्या देशातील 6 शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे.
स्वच्छ शहरांच्या यादीत अग्रभागी असावे हा नवी मुंबई महानगरपालिकेचा नेहमीच प्रयत्न राहिला असून या कार्यात सातत्याने मोठया प्रमाणावर लोकसहभागही राहिला आहे. 'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत 'स्वच्छ सर्वेक्षण 2021' चा प्रारंभ केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने ना.श्री.हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते, सचिव श्री. दुर्गाशंकर मिश्रा, स्वच्छ भारत मिशनचे संचालक श्री. व्ही.के. जिंदाल यांच्या सन्माननीय उपस्थितीत, नवी दिल्ली येथील निर्माण भवनमध्ये ऑनलाईन करण्यात आला असून त्यावेळी 'निर्मितीच्या स्थळी कचरा वर्गीकरण - घनकचरा व्यवस्थापनाची किल्ली (Segregation at source - key to Solid waste management)' या विषयावर आयोजित राष्ट्रीय वेबिनारमध्ये 'निर्मितीस्थळी कचरा वर्गीकरण करणारी अनुकरणीय कार्यप्रणाली (Best Practices in Source Sagregation)' म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा वर्गीकरण कार्यप्रणालीचे राष्ट्रीय स्तरावर वेब सादरीकरण महापालिका आयुक्त् श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी केले. हा एक प्रकारे महानगरपालिकेचा राष्ट्रीय स्तरावर बहुमानच होता.
त्यामुळे यापुढील काळात केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-2021 मध्ये कृतीशील सहभागासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झालेली आहे. या अनुषंगाने केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन मार्फत आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण -2021 बाबतच्या ऑनलाईन माहिती व प्रशिक्षण कार्यक्रमात महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
स्वच्छ सर्वेक्षण - 2021 करीता नविन मार्गदर्शक सूचना केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या असून यामध्ये नागरिकांच्या प्रतिसादाला (Citizen Feedback) सर्वाधिक महत्व् देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तपासणी पध्दतीत ऑनलाईन कार्यपध्दतीवर अधिक भर देण्यात येणार आहे. तसेच शहरांच्या स्वच्छता स्थितीवर विशिष्ट कालावधीपुरते लक्ष न देता सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून देशातील सर्व शहरांच्या दैनंदिन स्वच्छतेवर नियमीत लक्ष ठेवले जाऊन त्याचा परिणाम गुणांवर होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका शहरातील लोकप्रतिनिधी, विविध प्रकारच्या संस्था, मंडळे व स्वच्छताप्रेमी नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नातून नेहमीच उच्च क्रमांकावर मानांकीत राहिली असून स्वच्छ सर्वेक्षण - 2021 मध्येही सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून नवी मुंबई हे स्वच्छ शहरांच्या मानांकनात नंबर 1 वर आणण्यासाठी सर्वांचा प्रयत्न असेल असा विश्वास महापालिका आयुक्त् श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केला आहे.
Published on : 09-07-2020 14:18:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update