सन 2023-24 करिता मालमत्ता मूल्यांकनाबाबत नवी मुंबईकरांना सूचना
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची प्रकरण 8, कराधान नियम 13 नुसार अधिनियमाच्या अनुसूचीतील प्रकरण 8 कराधान नियम, नियम खंड (अ),(ब),(क) आणि (ड) अन्वये आवश्यक असलेल्या नोंदी सन 2023-24 या वर्षाच्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अंतर्भूत असलेल्या मालमत्तांच्या करनिर्धारण पुस्तकात व्यवहार्य असेल तितपत पूर्ण करुन ती पुस्तके पहाण्यासाठी संबंधित विभागीय अधिकारी यांचे कार्यालयात कामकाजाचे दिवशी दिनांक 12 फेब्रुवारी ते 04 मार्च 2023 पर्यंत सकाळी 11.00 ते संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत पाहण्यास उपलब्ध असतील.
या करनिर्धारण पुस्तक पडताळणी अंती ज्या मालमत्ताधारकांना अधिनियम कराधान नियम 7 प्रमाणे करनिर्धारणासाठी पात्र असलेल्या मालमत्तेची योग्य नोंद आढळून आली नाही अथवा करनिर्धारण झालेले नाही असे आढळून आल्यास त्यांनी संबधित दस्तऐवजासहित संबंधित विभाग अधिकारी यांचे कार्यालयात अथवा करनिर्धारण विभाग, मुख्यालय येथे लिखित अर्जासहित संपर्क साधावा.
सदर निर्देशित केलेल्या कराधान नियमामधील नियम 15 (1) अन्वये जाहीर करण्यात येते की, करनिर्धारण पुस्तकात नोंदलेल्या करपात्र मूल्याच्या आकारणी बाबत हरकतींचे प्रत्येक मालमत्तेकरिता स्वतंत्र लेखी अर्ज संबंधित विभाग अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक 04 मार्च 2023 पर्यंत स्विकारले जातील.
हे हरकतींचे लेखी अर्ज स्वत: मालमत्ताधारकांनी किंवा रितसर मुखत्यारपत्र दिलेल्या इसमांनीच केले पाहिजेत. त्या अर्जामध्ये कराधान नियम, नियम 16 (2) अन्वये तक्रारी संक्षिप्तपणे परंतू ज्या करपात्र मूल्यांकनाबाबत तक्रार आहे, त्याची संपूर्ण पार्श्वभूमी दर्शविणारे पत्रक जोडले पाहिजे. तसेच, त्या हरकतीबरोबर जर मालमत्तेचा एखादा भाग भाड्याने दिला असेल तर दर मजल्यास किती भाडे येते ते दर्शविणारे पत्रक सोबत जोडलेले असले पाहिजे.
या शर्तीप्रमाणे जर हरकत अर्ज नसतील तर त्यांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी. करपात्र मूल्याच्या आकारणीबाबतच्या हरकत अर्जाची संबंधित विभाग अधिकारी यांच्या कार्यालयाकडील अधिकृत पोचपावती असल्याशिवाय नोंद न झालेल्या / न मिळालेल्या अर्जास महापालिका आयुक्त जबाबदार राहणार नाहीत याची विशेष नोंद घेण्यात यावी. करदात्याने तसा तक्रार अर्ज पोष्टाने पाठविला असेल, तर त्या अर्जाची जबाबदारी सर्वस्वी अर्जदाराची राहील. मालमत्ताधारकांनी वरील सूचनांच्या अधिन राहून दाखल केलेल्या तक्रारींच्या सुनावणीअंती जे करपात्र मूल्य ठरेल, त्याचा फायदा चालू वित्तीय वर्षाच्या सुरवातीपासून म्हणजेच दिनांक 01 एप्रिल 2023 च्या प्रभावाने मिळेल, पूर्वप्रभावाने त्यापूर्वीच्या कालावधीसाठी नाही याचीही नोंद घ्यावी असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.
Published on : 10-02-2023 12:28:14,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update