सन 2055 मधील नमुंमपा लोकसंख्येकरिता आवश्यक पाणीपुरवठ्याविषयी नियोजनाची आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पामुळे जलसंपन्न शहर म्हणून ओळख असणा-या नवी मुंबईचा झपाट्याने होणारा विकास लक्षात घेता सध्याच्या साधाऱणत: 17.5 लक्ष लोकसंख्येला पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत असला तरी भविष्याचा वेध घेता वाढीव जलस्त्रोतांची आवश्यकता भासणार आहे. यादृष्टीने नव्या जलस्त्रोतांचा शोध घेण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी पुढाकार घेतला असून त्याबाबत गठीत केलेल्या विशेष समितीची बैठक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत विविध जलस्त्रोतांच्या शक्यतांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली.
नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या विशेष बैठकीस समितीचे सदस्य शहर अभियंता श्री. संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता तथा सदस्य सचिव श्री. मनोज पाटील, पाठबंधारे विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता श्री. एस.एस. वाघमारे, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी शहर अभियंता श्री. मोहन डगांवकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे निवृत्त मुख्य अभियंता श्री. मिलिंद केळकर, व्हिजेटीआयचे स्थापत्य आणि पर्यावरण अभियांत्रिकी प्रा. डॉ. पी.पी. भावे, आयआयटी मुंबईचे प्रा. डॉ. ज्योती प्रकाश आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राजवळ होणारे नियोजित विमानतळ तसेच चटई क्षेत्राबद्दलचे बदललेले नियम यामुळे शहर विकासाला गती लाभली असून एमएमआरडीए मार्फत केलेल्या सर्वेक्षण नियोजनानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या सन 2055 मध्ये 32 वर्षांनतर साधारणत: 44 लक्ष इतकी असेल. त्या अनुषंगाने लोकांना असलेली सर्वात महत्वाची पाण्याची गरज लक्षात घेता नव्या जलस्त्रोतांचा शोध घेणे गरजेचे आहे. याकरिता पाणी पुरवठ्याची सद्यस्थिती व भविष्यातील गरज लक्षात घेऊन अभ्यासांती नियोजन करण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या यश इंजिनिअरिंग यांच्यामार्फत विविध पर्यायांचे सादरीकरण समितीसमोर विचारार्थ मांडण्यात आले.
यामध्ये भूजलाचा वापर, नमुंमपा क्षेत्रानजीकच्या जलस्त्रोतांव्दारे पाणी उपलब्धता, मोरबे धरणाची उंची वाढविणे, कोंढाणे जलस्त्रोताव्दारे, बाळगंगा जलस्त्रोताव्दारे पाणी उपलब्धता, पावसाळी कालावधीत पातळगंगा नदीतील पाणी उचलणे, कुंडलीका नदीतील पाणी, भिरा धरणातील पाणी अशा अनेक पर्यायांवर पर्यायनिहाय बारकाईने विचार कऱण्यात आला.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी पुरेशा पाणी पुरवठ्याचा दूरगामी विचार करताना शेजारील सिडको क्षेत्र, पनवेल महानगरपालिका यांचाही होणारा विकास लक्षात घेऊन उपलब्ध जलस्त्रोत आणि पाण्याची गरज असणारी प्राधिकरणे यांचा एकत्रित विचार करून परस्पर समन्वय राखून मार्ग काढावा असे ठरविण्यात आले. 14 गावे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट होण्याची प्रक्रिया सुरु असून त्या क्षेत्राचा भविष्यातील विकासही जमेस धरण्याबाबत विचारविनीमय करण्यात आला.
सिडको कालावधीपासून 200 लिटर प्रती माणसी प्रती दिन इतका पाणीपुरवठा जमेस धरण्यात आला असून त्यानुसार भविष्यातील आवश्यक पाणी पुरवठ्याचे अंदाज काढावा असे सूचित कऱण्यात आले. चितळे समितीच्या अहवालाचाही यासाठी आधार घ्यावा याबाबतही विचार करण्यात आला.
अशा विविध पर्यायांचा विचार करताना त्या पर्यायांच्या पायाभूत सुविधांसाठी आणि पुढील काळात त्यावर होणा-या देखभाल दुरुस्ती खर्चाचाही विशेष विचार व्हावा तसेच त्या पर्यायांची आर्थिक उपयोगिता तपासण्यात यावी यावरही समिती बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. पायाभूत सुविधांमध्ये पाईपलाईनचाही दूरगामी कालावधीकरिता विचार व्हावा याकडेही विशेष लक्ष वेधण्यात आले.
पिण्यायोग्य शुध्द पाण्याचा विचार करताना शहरात दररोज निर्माण होणा-या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यापासून निर्माण होणारे प्रक्रियाकृत पाणी पिण्याव्यतिरीक्त इतर कामांसाठी वापरामुळे पिण्याच्या पाण्यात होणारी बचतही विचारात घेण्यात यावी असे या बैठकीत सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रात होणा-या बांधकामांसाठी विकासकांनी या प्रक्रियाकृत पाण्याचा वापर करणेबाबत धोरण तयार करावे व पिण्याच्या पाण्यात बचत करावी याबाबतही चर्चा करण्यात आली.
अशाप्रकारे शहर विकासाच्या वेगाचा अंदाज घेऊन पुढील 32 वर्षात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील संभाव्य लोकसंख्येला आवश्यक पाणी पुरवठा मिळावा यादृष्टीने आत्तापासूनच नियोजन करण्याची गरज लक्षात घेऊन नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी पुढाकार घेतला असून त्यादृष्टीने नव्या जलस्त्रोतांचा शोध घेण्यासाठी गतीमान पावले उचलण्यात येत आहेत.
Published on : 13-06-2023 13:54:34,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update