*जागतिक दिव्यांग दिनी 21 प्रकारचे दिव्यांगत्व आणि स्वच्छतेविषयी वॉकेथॉनव्दारे व्यापक जनजागृती*





जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या इटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राच्या वतीने आयोजित वॉकेथॉ़नमध्ये 400 हून अधिक दिव्यांग मुले, त्यांचे पालक व दिव्यांग व्यक्तींनी सहभागी होत दिव्यांगत्वाविषयी तसेच स्वच्छता आणि सर्व शिक्षा अभियानाविषयी जनजागृती केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहानुभूती दाखविण्यापेक्षा कृतीतून आपुलकी प्रदर्शित करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत ज्या उत्साहाने वॉकेथॉनमध्ये दिव्यांगांनी सहभागी होत आत्मशक्तीचे दर्शन घडविले ती प्रशंसनीय असल्याचे मत व्यक्त केले. क्रिकेटपटू चंद्रशेखर, नृत्यांगना सुधा चंद्रन अशी आपल्या दिव्यांगत्वावर मात करून स्वबळावर पुढे आलेल्या व्यक्तींची उदाहरण देत नवी मुंबईतून अशी लौकिकप्राप्त व्यक्तिमत्वे घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवी मुंबईचा स्वच्छतेमध्ये देशात तिसरा क्रमांक निश्चय करून पहिला येण्याच्या दृष्टीने दिव्यांग घटकांनीही स्वयंस्फुर्तीने वॉकेथॉनच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश प्रसारित केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
याप्रसंगी समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा नमुंमपा स्वच्छ भारत मिशन नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, इडियन पेडियाट्रिक असो. नवी मुंबई अध्यक्ष डॉ. जितेंद्र गव्हाणे, आरोह रिहॅबिलेटेशन सेंटरच्या प्रमुख श्रीम. जुई खोपकर, व्ही कनेक्ट संस्थेचे प्रमुख श्री. अंकुश चांडक, एव्हरेस्ट सायकलींग क्लब संस्थेचे प्रमुख श्री. काझी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनी विविध प्रकारच्या दिव्यांगांना शिक्षण, प्रशिक्षण व सेवा सुविधा देण्याची बांधिलकी जपणारे महानगरपालिकेचे इटीसी केंद्र देशापरदेशात नावलौकिकप्राप्त असल्याचे सांगत यापुढील काळातही दिव्यांगांचे सक्षमीकरण करण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचे सूचित केले. महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित वॉकेथॉनप्रमाणेच महिनाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
इडियन पेडियाट्रिक असो. नवी मुंबई अध्यक्ष डॉ. जितेंद्र गव्हाणे यांनी शारीरिक कमतरतेमुळे कुणी व्यक्ती सामाजिक प्रवाहात मागे राहता कामा नये हे आपले ध्येय असून 2030 पर्यंत ते साध्य करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आलेले आहे. त्यादृष्टीने नवनवीन संकल्पनांचा वापर करणे गरजेचे असून या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका इटीसी केंद्राच्या माध्यमातून आघाडीवर आहे, शिवाय नवजात अर्भकांच्या सुदृढतेच्या दृष्टीने आवश्यक स्क्रिनींगमध्येही नमुंमपा आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे ही प्रशंसा करण्यासारखी बाब असल्याचे सांगितले.
यापूर्वी प्रचलित 6 प्रकारच्या दिव्यांगत्वामध्ये आता आणखी प्रकार समाविष्ट करीत लोकोमोटर दिव्यांगत्व, कुष्ठरोग निवारणपश्चात, सेरेब्रल पाल्सी, शारीरिक वाढ कुंठीतता, स्नायूविकृती, ॲसीड ॲटेक ग्रासीत व्यक्ती, दृष्टीदोष, अंधत्व, अंशत: अंधत्व, कर्णबधिरत्व, वाचिक व भाषिक दिव्यांगत्व, बौध्दीक अक्षमता, विशिष्ट अध्ययन अक्षमता, स्वमग्नता, मानसिक वर्तनविषयक आजार, बहुविध दृधन, पार्किसन्स, हिमोफेलिया, थॅलेसेमिया, सिकल सेल आजार, बहुविकलांगता असे दिव्यांगत्वाचे 21 प्रकार असल्याबाबतची जनजागृती वॉकेथॉनच्या माध्यमातून करण्यात आली.
सीवूड रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपूलाच्या खालील बाजूने सुरू झालेल्या वॉकेथॉनला सकाळी 7.30 पासूनच दिव्यांग मुले, त्यांचे पालक तसेच दिव्यांग व्यक्तींनी उपस्थित राहत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. महापालिका मुख्यालयापर्यंत दिव्यांगत्वाच्या 21 प्रकारांविषयी तसेच शहर स्वच्छतेविषयी विविध घोषणा देत या वॉकेथॉनच्या माध्यमातून दिव्यांगांनी व्यापक स्वरूपात जनजागृती केली. मुख्यालयामध्ये मनोरंजन आणि प्रबोधनाचा एकत्रित अविष्कार असणारे पथनाट्य नाट्यशाळा संस्थेच्या कलाकारांनी सादर केले. आयुष चांडक या दिव्यांग विद्यार्थ्याने आपल्याला ऐकू येत नाही हे पालकांना सुरूवातीला कळलेच नाही असे अनुभवकथन केले. यावर डॉ. जितेंद्र गव्हाणे यांनी मुल जन्मल्यानंतर त्यांच्या स्क्रिनींग टेस्ट करण्याचे महत्व अधोरेखीत केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या समवेत सर्व उपस्थितांनी स्वच्छतेची तसेच वसुंधरा संवर्धनाची सामुहिक शपथ ग्रहण केली.
वॉकेथॉनमध्ये सहभागी दिव्यांग विद्यार्थी, दिव्यांग व्यक्तींना आयुक्तांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तिपत्र वितरित करण्यात आले.
Published on : 03-12-2022 11:09:30,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update