*पहिल्या दिवशी 27 गर्भवती महिलांचे कोव्हीड लसीकरण*

गर्भवती महिलांना कोव्हीड 19 पासून संरंक्षण मिळावे यादृष्टीने शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार आजपासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ व ऐरोली येथील सार्वजनिक रूग्णालयात लसीकरणाला सुरूवात करण्यात आलेली आहे. गर्भवती महिलांच्या लसीकरणाच्या आज पहिल्याच दिवशी 27 गर्भवती महिलांचे लसीकरण करण्यात आले तसेच 232 गर्भवती महिलांचे लसीकरणाबाबत संपूर्ण माहिती देऊन समुपदेशन करण्यात आले.
गर्भवती मातांना कोविड लसीकरणाव्दारे संरक्षित करणेविषयी जागतिक स्तरावर संशोधन करण्यात येत होते. यामध्ये कोविड 19 आजाराचा गर्भवती माता तसेच गर्भावर होणारा परिणाम याचा सखोल अभ्यास करण्यात आला. त्यास अनुसरून राष्ट्रीय तांत्रिक लसीकरणविषयक मार्गदर्शक समुह - NTAGI (National Technical Advisory Group for Immunizaion) तसेच जागतिक आरोग्य संघटना यांच्या शिफारशीनुसार गरोदर मातांना लसीकरण करण्याचा केंद्र आणि राज्य शासनाने निर्णय घेतला.
या शिफारसींनुसार - गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या कालावधीत केव्हाही लसीकरण करता येईल. गरोदरपणाच्या कालावधीत देण्यात येणाऱ्या Td लसी सोबत कोविड 19 लस देता येईल. मात्र सोबत दिली न गेल्यास 15 दिवसाच्या अंतराने देता येईल. तसेच गर्भवती महिलेस मधुमेह, उच्च रक्तदाब इ.आजार असले तरीही लसीकरण करता येईल असे सूचित करण्यात आले आहे.
त्यास अनुसरून शासनामार्फत प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या रुग्णालयांतील तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. त्याचप्रमाणे NMOGS, IAP, IMA, NIMA, HIMPAM अशा खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांचे आणि खाजगी लसीकरण केंद्रांवरील आरोग्यकर्मींचेही प्रशिक्षण घेण्यात आले आहे.
सध्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या 3 रूग्णालयांमध्ये गर्भवती महिलांच्या लसीकरणाला सुरूवात करण्यात आली असून टप्प्याटप्प्याने इतरही केंद्रात गर्भवती महिलांचे लसीकरण करण्यात येणार असून गर्भवती महिलांनी अत्यंत सुरक्षित असलेले कोव्हीड लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 19-07-2021 08:00:22,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update