कन्टेनमेंट झोन वगळता 28 जूनपासून सलून, ब्युटी पार्लरमध्ये काही सेवा देण्यास परवानगी
महाराष्ट्र शासनामार्फत दि. 25 जून 2020 रोजी जारी करण्यात आलेल्या 'मिशन बिगीन अगेन - टप्पा - 4' मध्ये नमूद मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 ची अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी दि. 27 जून 2020 रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी आदेश जारी केला आहे.
या आदेशात नमूद केल्यानुसार दि. 28 जून 2020 पासून 'मिशन बिगीन अगेन' च्या चौथ्या टप्प्यात नाभिक दुकाने, सलून आणि ब्युटी पार्लर यांना मर्यादित प्रवेशाच्या अधीन रहात, आगाऊ नोदणी करून, काही अटी व शर्तींवर परवानगी देण्यात आली आहे.
* सदर दुकानांमध्ये सेवा पुरविताना केस कापणे, हेअर डाय करणे, वॅक्सींग, थ्रेडींग इ. यांनाच परवानगी देण्यात आली आहे. त्वचेसंबंधित सेवांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. याबाबतच्या स्पष्ट सूचना दुकानात दर्शनी भागात प्रदर्शित करावयाच्या आहेत.
* तेथील कर्मचा-यांनी ग्लोव्हज, ॲप्रन, मास्क आदी सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनाकारक असेल.
* तेथील कामाची जागा (खुर्ची) ही प्रत्येक सेवा पुरविल्यानंतर निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य आहे.
* तेथील सार्वजनिक वापराच्या भागाचे आणि फ्लुअरचे प्रत्येक 2 तासानंतर निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असणार आहे.
* ग्राहकांसाठी वापरले जाणारे टॉवेल्स / नॅपकिन्स हे एकदा वापरल्यानंतर पुन्हा वापरात न येण्यासारखे (डिस्पोसेबल) असावेत. पुन्हा वापरात येणारी उपकरणे / साहित्य हे प्रत्येक वापरानंतर स्वच्छ व निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे.
* प्रत्येक दुकानांमध्ये या सर्व सूचना ग्राहकांना दिसतील अशा प्रकारे प्रदर्शित करणे आवश्यक आहे, अशा सर्व बाबींची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
महत्वाचे म्हणजे महानगरपालिकेमार्फत जाहीर करण्यात आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात (Containment Zones) नाभिक दुकाने, सलुन आणि ब्युटी पार्लर सेवा देण्यास परवानगी असणार नाही.
तरी संबंधितांनी व नागरिकांनी याची नोंद घेऊन संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 28-06-2020 16:42:52,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update