*नवी मुंबईतील 3 हजार मुलांनी चित्रे रेखाटत साजरा केला स्वच्छतेचा बालमहोत्सव*
*मुलांच्या उमलत्या वयात त्यांच्या मनातील विविध कल्पनांना चित्रांच्या माध्यमातून मोठे अवकाश उपलब्ध करून देणारा नवी मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेला हा स्वच्छ चित्रकला स्पर्धेचा उपक्रम अत्यंत स्त्युत्य असून या माध्यमातून कोरोना काळात मुलांच्या मनात कोंडलेल्या भावभावनांना अभिव्यक्त होण्यासाठी मोकळी वाट मिळाली अशा शब्दात जगप्रसिध्द सुलेखनकार श्री. अच्युत पालव यांनी चित्रकला स्पर्धा उपक्रमाची प्रशंसा केली.*
*बालदिनाचे औचित्य साधून 'स्वच्छ सर्वेक्षण 2022' ला सामोरे जात असताना स्वच्छ नवी मुंबई शहराविषयी मुलांच्या मनात असलेल्या संकल्पनांना मूर्तरूप देण्याच्या उद्देशाने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे येथील प्रशस्त निसर्गोद्यानात आयोजित करण्यात आलेल्या 'स्वच्छ चित्रकला स्पर्धे'त इयत्ता आठवी ते दहावीच्या 2997 विद्यार्थ्यांनी सहभागी होत हा उपक्रम यशस्वी केला.*
याप्रसंगी मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त श्रीम.सुजाता ढोले, सुलेखनकार, चित्रकार श्री. अच्युत पालव, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री. जयदीप पवार, सहा. आयुक्त श्री. अनंत जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम.ऋतुजा संखे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई शहराचे भविष्य असणारी ही मुले आज आपल्या मनातल्या स्वच्छतेविषयीच्या संकल्पना चित्रांतून साकारताहेत, हीच मुले उद्याच्या स्वच्छ, सुंदर नवी मुंबईचे शिल्पकार असतील असा विश्वास अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी व्यक्त केला. त्यांच्यासमवेत स्पर्धेत सहभागी सर्व मुलांनी व उपस्थितांनी निसर्गाच्या पंचतत्वाचे रक्षण करण्याची 'माझी वसुंधरा अभियान' सामुहिक शपथ ग्रहण केली. पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जयंतीदिन बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. याप्रसंगी पंडितजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सकाळी 7 ते 7.15 वाजल्यापासूनच मुले, शिक्षक, पालक अत्यंत उत्साहाने कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानात उपस्थित होते. प्रत्येक मुलाला अ.क्र. सह पाठीमागील बाजूस त्याची माहिती भरण्यासाठी असलेला चित्रासाठीचा कागद देण्यात आला. भव्य जागेत पसरलेल्या हिरवळीवर सकाळच्या कोवळ्या उन्हात मुले आपापल्या शाळांनुसार गोलाकार रिंगण करून चित्र काढण्यासाठी बसली आणि बघता बघता निसर्गोद्यानाला चित्रनगरीचे स्वरूप आले.
इयत्ता 8 वी ते 10 वी च्या 2997 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्साहाने सहभागी होत, 'माझे शहर - माझा सहभाग', 'प्लास्टिकमुक्त माझे शहर', 'स्वच्छतेचा बालमहोत्सव' या तीनपैकी आपल्या आवडत्या विषयावर मनातील स्वच्छता संकल्पनांना चित्रांतून रंग व आकार दिला.
लवकरच या स्वच्छ चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येणार असून पहिल्या 3 क्रमांकांना रु,11 हजार, 7 हजार व 5 हजार तसेच 10 उत्तेजनार्थ चित्रकृतींना प्रत्येकी रु. 1 हजार रक्कमेची पारितोषिके स्मृतिचिन्हांसह प्रदान केली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रशस्तिपत्र दिले जाणार आहे.
नवी मुंबई शहराला भविष्यात आकार देणा-या मुलांच्या मनातील स्वच्छ, सुंदर, पर्यावरणशील नवी मुंबई शहराविषयीच्या चित्रमय संकल्पनांना मुक्त व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्वच्छ चित्रकला स्पर्धेत आठवी ते दहावीच्या 3 हजार विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपल्या मनात असलेले स्वच्छ नवी मुंबई शहराविषयीचे प्रेम चित्रांतून प्रदर्शित केले आहे.
Published on : 14-11-2021 12:09:24,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update