*जागतिक दिव्यांग दिनी 3 डिसेंबरला दिव्यांगांची जनजागृतीपर वॉकेथॉन*
एकाच छताखाली विविध प्रकारच्या दिव्यांगांना शिक्षण, प्रशिक्षण व सेवा सुविधा देणारे देशातील एकमेव केंद्र म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या इटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्राचा गौरव होत असून येथील विविध उपक्रमांनाही दिव्यांगासह त्यांच्या कुटूबियांचा व नागरिकांचा चांगला सहभाग मिळत आहे.
3 डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यंगत्वाबाबत जनजागृती करण्यासाठी इटीसी केंद्रामार्फत डिसेंबर महिन्यात महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदशानाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये दिव्यांगत्वाबाबत जनजागृती तसेच दिव्यांगांमार्फत स्वच्छतेचा संदेश प्रसार करणा-या अभिनव वॉकेथॉनचे जागतिक दिव्यांग दिनी आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये दिव्यांग विदयार्थी व त्यांचे पालक, विविध वयोगटातील दिव्यांग नागरिक, दिव्यांगाविषयी कार्य करणा-या संस्थांचे प्रतिनिधी, इटीसी केंद्रातील शिक्षक व कर्मचारी सहभागी होणार आहेत.
3 डिसेंबर 2022 रोजी सीवूड स्टेशनजवळील एलॲण्डटी ब्रीजखालील मोकळी जागा, सेक्टर 50, नेरुळ येथून, सकाळी 8 वा. या दिव्यांग वॉकेथॉनचा प्रारंभ होणार असून महानगरपालिका मुख्यालय येथे सकाळी 9 वा. सांगता होणार आहे. याप्रसंगी जनजागृतीपर पथनाटय सादर होणार असून दिव्यांगत्वाबाबत मान्यवरांचे मार्गदर्शनही लाभणार आहे.
अशाच प्रकारे संपूर्ण डिसेंबर महिन्यात दिव्यांगत्वाबाबत जनजागृतीपर कार्यक्रमांचे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ठिकठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे.
Published on : 03-12-2022 10:56:02,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update