एम.आय.डी.सी. क्षेत्रात 8 हजाराहून अधिक कर्मचा-यांच्या कोव्हीड 19 चाचण्या

'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत टप्प्याटप्प्याने उद्योग - व्यवसायांना सुरूवात झाली असून सर्वात मोठा औद्योगिक पट्टा असणा-या ठाणे - बेलापूर पट्टीतही उद्योग समुह सुरू झाले आहेत. या विविध प्रकारच्या उद्योग समुहांमध्ये काम करण्यासाठी आसपासच्या शहरांतून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी दररोज ये-जा करीत असतात. त्यामुळे कोव्हीड 19 प्रसाराच्या दृष्टीने जोखमीचे असणा-या एम.आय.डी.सी. क्षेत्राकडे विशेष लक्ष पुरविण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार 28 सप्टेंबरपासून विविध कंपन्यांमध्ये जाऊन कोव्हीड 19 टेस्टींग केले जात आहे. याशिवाय ठाणे बेलापूर इंडस्ट्रिज असोसिएशनच्या कार्यालयातही स्थायी कोव्हीड 19 तपासणी केंद्र कार्यान्वित आहे.
एम.आय.डी.सी. क्षेत्रात आत्तापर्यंत 8055 अधिकारी, कर्मचारी यांच्या कोव्हीड 19 तपासण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये 191 चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. या कर्मचा-यांवर लगेच उपचार सुरू करण्यात आले असून त्या प्रत्येक पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कातील 22 हून अधिक व्यक्तींचीही तपासणी करण्यात आलेली आहे.
आत्तापर्यंत 24 मोठ्या उद्योग समुहांमध्ये शिबीर आयोजित करण्यात आले असून लहान उद्योग समुहातील कर्मचा-यांना त्यांच्या व्यवस्थापनामार्फत टी.बी.आय.ए. च्या कार्यालयात आणून टेस्टींग केले जात आहे. सध्या मागील 5 दिवसांपासून दिघा येथील मुकंद कंपनीत कोव्हीड 19 विशेष तपासणी शिबीर होत असून त्याठिकाणी दररोज साधारणत: 300 कर्मचा-यांची कोव्हीड विषयक तपासणी केली जात आहे. एम.आय.डी.सी. क्षेत्रात ही मोहीम राबविण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक महामंडळ, ठाणे बेलापूर इंडस्ट्रिज असोसिएशन, स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असो. अशा विविध प्राधिकरण, संस्थाचे महत्वपूर्ण सहकार्य लाभत आहे.
महानगरपालिकेमार्फत 'मिशन ब्रेक द चेन' मोहीम ट्रेस, टेस्ट, ट्रिट या त्रिसूत्रीवर भर देत प्रभावीपणे राबविण्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले असून कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट होताना दिसत आहे. तथापि यामुळे गाफील न रहाता कोव्हीडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कायम सतर्क असणे गरजेचे आहे. याकरिता मास्क, सोशल डिस्टन्सींग, वारंवार हात धुणे अशा सुरक्षात्मक बाबींची काळजी घेणे हाच सध्यातरी सर्वोत्तम उपाय आहे. या अनुषंगाने ए.पी.एम.सी. मार्केटप्रमाणेच एम.आय.डी.सी. क्षेत्रातील कंपन्या या कोव्हीडच्या दृष्टीने जोखमीच्या भागांकडे विशेष लक्ष देण्यात येत असून एम.आय.डी.सी. व एम.पी.सी.बी. कार्यालयांच्या सहयोगाने नवी मुंबई महानगरपालिका ही कोव्हीड 19 तपासणी मोहीम गांभीर्याने राबवित आहे.
Published on : 04-11-2020 14:18:47,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update